पान:तीन तत्वज्ञानी.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.


संबंध आहे ! सुख व दुःख ही मनुष्याला एकदम मिळत नाहीत; परंतु सुखाचा पाठलाग करून ते माणसाने मिळविलें, की, त्याच्या मागोमाग दुःख आलेच म्हणून समजा ! जणूं काय सुखदुःख या दोन भिन्न वस्तूंची एका टोकाला गांठ बांधलेली आहे ! ही सुखदुःखांची सांगड जर ईसाबाने पाहिली असती, तर त्याने यावर एक अशी गोष्ट रचली असती, की, सुख-दुःखांचे भांडण होत असतां देवाने त्यांचा समेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे त्याला साधले नाही, तेव्हां त्याने त्यांची टोकें एके ठिकाणी बांधिली, व म्हणूनच मानव प्राण्याला एक मिळाले की, दुसरें त्याच्या पाठोपाठ मिळणारच म्हणून समजावे. पहा, माझी अशीच स्थिति झाली आहे. माझ्या पायांतल्या बिड्यांमुळे आतांपर्य मला दुःख होत होते, परंतु त्या बिड्या काढल्याबरोबर दुःखाच्या मागोमाग सुख आलेच !"

 असे म्हणून साक्रेटिसाने आपल्या सभोवार जमलेल्या मित्रमंडळीकडे दृष्टि फेंकली. तेव्हां त्या मंडळींत अथेन्सशिवाय इतर शहारांतले परकी गृहस्थहि आले आहेत, असे त्याला आढळून आले व त्यांपैकी सीन्स या गृहस्थाने प्रथमतः बोलण्यास सुरवात केली. तो म्हणाला ' अहो साक्रेटिस ! तुम्ही तुरुंगांत असतांना अपोलो देवांची प्रार्थना कवितेत केली, व ईसाबाच्या गोष्टींना पद्यात्मक स्वरूप दिले याबद्दल दोन दिवसांपूर्वी ईव्हीनस हा कवि मजजवळ चौकशी करीत होता. तरी कृपा करून याचे कारण आपण सांगाल काय?"

 सॉक्रेटिस उत्तरला, " सीन्स, त्यांना खरें तेच सांगा. त्यांना म्हणावें आपल्याशी किंवा आपल्या कवितांशी स्पर्धा करण्याच्या बुद्धीने मी कविता केल्या नाहीत. तसे करणे कांही सोपें काम नाही. परंतु नेहमीं नेहमी मला एक स्वप्न पडत असे, ते असे की, सॉक्रेटिस, काव्याचा अभ्यास करून काव्य रचा." या स्वप्नाचा मी नेहमी असा अर्थ घेत असे की. देव मला माझ्या अंगीकृत कामांत उत्तेजनच देत आहे. कारण मी आपले सर्व आयष्य अध्यात्मविद्येत घालविले आहे व अध्यात्मविद्या हीच सर्वांत

३३