पान:तीन तत्वज्ञानी.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)
साक्रेटिसाचा मृत्यु.

 "नास्ति जीवितादभिमततरं किमपीह जन्तूनाम् ” ही बाणभट्टाची उक्ति किती यथार्थ आहे ! प्राणिमात्राला आपल्या जीवापेक्षा जास्त प्यारे काही नाही ! मातेचे पुत्रावरील प्रेम अत्यंत निरपेक्ष व प्राणापलीकडील असते असे आपण म्हणतो. परंतु खरी स्थिति एका हरिदासी गोष्टींत वर्णिलेल्या वानरीच्या स्थितीप्रमाणे आहे, यांत शंका नाही. एकदां एक वानरी एका पुरांत सांपडली, तेव्हां ती आपले मूल पाठीवर वेऊन एका उंच ठिकाणी जाऊन बसली; परंतु तेथेहि पाणी आल्यावर ती आणखी उंच ठिकाणी गेली, पण पाणी तितक्या उंच चढले, तेव्हां वानरीचा निरुपाय होऊन ती दोन पायांवर उभी राहिली, आणि आपल्या मुलाला तिने डोकीवर घेतले परंतु पाणी भराभर चढतच चाललें, व तिच्या गळ्यापर्यंत येऊन तिचा जीव गुदमरूं लागला, तेव्हां तिने आपले डोकीवरचें मूल काढून आपल्या पायांखाली घातले, व त्यावर उभी राहून पाण्यापासून आपला बचाव करूं लागली, पण व्यर्थ ! शेवटी त्या पुरांत वानरी व तिचे पिलूं या दोघांचाहि अंत झाला. तेव्हां सर्वांना आपल्या स्वप्राणापलीकडे प्रियतम काही नाही, हे खरे आहे, व हीच गोष्ट मनुष्यप्राण्यालाही लागू आहे. मनुष्याला जीवितासारखें दुसरें कांहीएक प्रिय नाही. "अंगं गलितं पलितं मुंडं, दशनविहीनं जातं तुंडम्" अशा जख्खड म्हाताऱ्यालासुद्धां जीवाची आशा सुटत नाही. एकाद्या इरसाल तिमाजी नाईकासारख्या चिक्कू माणसाला प्राणापेक्षां पैसा प्रिय आहेसा दिसतो; परंतु अशा तिमाजी नाईकापुढे जर यमराज खरोखरच दत्त म्हणून उभे ठाकले, तर त्याची

३१