पान:तीन तत्वज्ञानी.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

बाबतीचा विचार करूं नका ? तुझो अशा तऱ्हेनें वागलांत तरच तुह्माला स्वर्गातील न्यायाधीशापुढे उजळ माथ्याने उभे राहतां येईल व आपले संरक्षण योग्य प्रकारे करता येईल. हे अगदी उघड आहे की, तुमच्या पळपुट्या वर्तनाने तुमाला किंवा तुमच्या मित्रांना इहपरलोकीं मुळीच सुख होणार नाही, किंवा तुमचे आयुष्य उन्नत किंवा पवित्र होणार नाही. आतां तुही जर मेलांत तर लोक असें ह्मणतील की, अथीनियन लोकांनी साक्रेटिसास अन्यायाने शिक्षा दिली; परंतु तुमच्या विरुद्ध त्यांना चकार शब्दहि काढतां येणार नाही. परंतु जर तुम्ही अशा लज्जास्पद रीतीने अन्यायाची अन्यायाने फेड केलीत व वाईटाची वाईटाने फेड केलीत आमच्याशी केलेले करारमदार मोडलेत व ज्याच्या घाताचा विचार तुझी स्वप्नांतहि कधी आणूं नये त्या तुमच्या मित्रांचा, तुमच्या देशाचा व आमचा घात तुह्मीं केलात तर आह्मी तुमच्या जीवांत जीव आहे तो तुमच्यावर रुष्ट राहूं व तुह्मी मेल्यावर आमचे परलोकचे कायदेबंधु प्रेमाने तुमचे आदरातिथ्य करणार नाहीत. कारण, त्या कायद्यांना समजेल की, पृथ्वीवर असतांना तुम्ही आपल्या हातून होईल तितकी कायद्याची पायमल्लीच केलीत. तेव्हां तुम्ही आमचे म्हणणे ऐका. क्रिटोच्या मनधरणीकडे लक्ष देऊ नका !"

 प्रिय क्रिटो ! हे कायद्यांचे शब्द माझ्या कानांत सारखे गुणगुणत आहेत असे मला वाटते व यामुळे मला दुसरें कांहीहि ऐकू येत नाहीं व म्हणूनच माझें मन वळविण्याचा तुमचा प्रयत्न अगदी व्यर्थ आहे ! तरी सुद्धां जर तुम्हाला आपला हेतु साध्य वाटत असेल तर तुम्ही आपला प्रयत्न चालू ठेवा."

 यावर क्रिटो म्हणाला " साक्रेटीस ! आपल्या म्हणण्यापुढे माझ्याने कांहींहि बोलवत नाही, मी कुंठित झालो आहे."

 साक्रेटीस म्हणाला " प्रिय क्रिटो ! तर मग आपण हा वाद थांबवूया व ईश्वर जशी आपणाला प्रेरणा करीत आहे त्याप्रमाणेच वागू या."

३०