पान:तीन तत्वज्ञानी.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

म्हणून त्यांना मी झुगारून देतो. यावर आम्ही कायदे तुम्हांला विचारतों की, असा का तुमचा आमचा करार होता! तुमच्या फायद्याचे हिताचे असले म्हणजेच कायदे पाळावे असें म्हणाल तर मग त्यांत कायदा पाळण्याचा सद्गुण तो काय ? तुम्ही स्वार्थाकारितां कायदा पाळला असे होईल. एका विवक्षित प्रसंगी कदाचित् तुम्हांला अन्याय झाला असेल पण सामान्यत्वे कायद्यांचा तुम्हाला उपयोग होतो ना ? तुमचे जीवित, तुमचे संगोपन, तुमचे शिक्षण, तुमचे जीवितसंरक्षण, तुमची विश्रांति ही मुळी कायद्यामुळेच आहेत ना ? कायद्याने तुमचे आईबाप विवाहपाशबद्ध झाले व त्याअन्वयेंच तुमचे कुलीनपणाने जगांत येणे संभवनीय झालें. पुढे तुमचे संगोपन, शिक्षण वगैरे सर्व कायद्याच्या बंधनामुळे झाली. असे मनुष्याच्या सर्वतोपरी उपयोगी पडणारे जे आम्ही कायदे, त्यांच्या मुळावर आपल्या वर्तनाने तुम्ही घाला घालण्यास कसे प्रवृत्त होतां ? कायदा जे काम करावयास सांगेल ते केलेच पाहिजे, हेच नागरिकांचे कर्तव्यकर्म नाहीं का ? कायदा पाळण्याच्या सद्गुणाचे तुम्हींच इतके दिवस गोडवे गायलेत ना ? आतां तुमच्यावर कायद्याचा अनिष्ट परिणाम होऊ लागल्याबरोबर तुम्ही आम्हाला झुगारून देणे रास्त होईल काय ? शिवाय जर आमचा अंमल तुम्हाला सुखावह वाटत नव्हता तर तुम्हाला शहर सोडून जाण्याची मुभा होती. परंतु तुम्हाला तर आमचे साम्राज्य आवडत होते. जरी तुम्ही अथेन्स खेरीज दुसऱ्या राज्यव्यवस्थेची तारीफ करीत होता, तरी तुम्ही आपले सत्तर वर्षांचे आयुष्य येथेच घालविलें; आपला संसार येथेच केलात; येथल्या व कायद्याच्या अंमलाखाली आपले इतके दिवस सुखासमाधानाने गेले. तुमच्या येथे राहण्यानें, येथे संसार करण्याने तुम्ही अथेन्सचे कायदे पाळण्याचा प्रत्यक्ष करार केला नाही काय ? व आतां तुमच्या मते तुम्हाला अन्यायाने शिक्षा झाली म्हणून तुम्ही मुळी कायद्याच्या मुळावरच घाला घालावयास लागला, याला काय म्हणावें ? कायदा मोडण्याने तुम्ही तिहेरी पापाचे धनी होत नाही काय? आम्ही तुम्हाला गुरूसमान, तेव्हां यांत गुरूची अवज्ञा होते.

२८