पान:तीन तत्वज्ञानी.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

कारणांचा येथे संबंध येत नाही. आपले करणे सुविचाराला पटते किंवा नाही, हाच काय तो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रिय क्रिटो ! मी करीत आहे हे युक्तीस व सुविचारास धरून आहे, अशी माझी पूर्ण खातरी आहे व तुमचीहि तशीच व्हावी अशी माझी इच्छा आहे. जनतेच्या मताला मान देण्याचे कारण नाही, हे मी आजपर्यंत म्हणत आलों नाहीं का ? मत आपल्या फायद्याचे आहे ह्मणून ते मत आजच ग्राह्य झाले काय ? वाईट तें सर्वत्र वाईटच ना ? आपल्यावर दुर्दैव ओढवले ह्मणून. वाईटाचे चांगले असें ह्मणावयाचे नाही ना ? मग अथीनियन लोकांच्या हुकुमाने मला येथे आणून ठेविले असतां त्यांच्या संमतीवांचून येथून जाणे रास्त होईल का ? एकाने अन्याय केला ह्मणून दुसऱ्याने त्याचप्रमाणे वागावे काय ? एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरूं मारूं नये असे आजपर्यंत आपण शिकवीत आलो ते आतां धाब्यावर बसवावयाचे काय ? अथोनियन लोकांनी मला अन्यायाने शिक्षा केली ह्मणून आपण आपले ब्रीद सोडावे काय ? तेव्हां कोणत्याहि दृष्टीने विचार करतां माझे येथून निघून जाणे गैर होईल; असें तुह्माला दिसत नाही काय ? मला तर माझे असे वर्तन म्हणजे सर्व आयुष्यातील विचारांवर क्षणिक जीवाच्या आशेकरितां पाणी सोडण्यासारखे वाटत आहे ! कायदा पालन करणे हा एक सद्गुणाचा प्रमुख भाग आहे. त्याचे अशा करण्याने उल्लंघन होत नाही का ? मला तर या क्षणी माझ्यापुढे जणूं कांहीं अथेन्सचे कायदे व राज्यघटना ही मूर्तिमंत उभी असून ती माझी कानउघाडणी करीत आहेत असे वाटते. 'साक्रेटिस ! काय करावयाचे मनांत आणिलें आहे ? तुमच्या पळण्याच्या प्रयत्नाने तुझी आमचा गळाच दाबीत नाही काय ? कायदा व राज्यघटना यांखेरीज कोणता समाज सुरळित चालू शकेल ? जेथे कायद्याची पायमल्ली होते, जेथे खासगी व्यक्ति कायद्याला धाब्यावर बसवितात, जेथें न्यायाधिशांचा निकाल कोणी जुमानीत नाही, तेथे सुरक्षितपणे राहणे तरी शक्य आहे. काय ? साक्रेटीस ! तुम्ही म्हणाल, कायद्यांनी मला अन्यायाने वागविलें.

२७