पान:तीन तत्वज्ञानी.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

हे आपले कर्तव्यकर्म आहे, ते कर्तव्यकर्म आपल्या मरणाने आपण टाळीत नाही काय ? हा एक आपला भित्रेपणाच आहे. आपल्या पश्चात् आपली मुले पोरक्यासारखींच होणार व अशा मुलांची स्थिति पुढे कशी होते हे आपल्याला ठाऊकच आहे. आपल्या मुलांचे संगोपन व संवर्धन करण्याचे काम करण्याची ज्याची इच्छा नाही त्या मनुष्याने संसारांत पडूं नये ! शिवाय, आपल्या या प्रसंगांत प्रथमपासून अन्याय व चुका झालेल्या आहेत. प्रथमतः आपल्याला मुळी खटल्यांत हजर राहण्याचेच कारण नव्हतें ! पुढे खटला चालविण्याच्या कामांतहि चुका झाल्या व आतां शेवटी आपला अन्यायाने जीव जाणार. तरी आपण या अन्यायाला कां बळी पडावें ? तेव्हां गुरुजी, माझें ऐका. मी सर्व तयारी केली आहे. आतां विचार करण्यास वेळ नाही. आजच्या रात्रीच येथून गेले पाहिजे. नाही तर सर्व घात झालाच म्हणा. तरी ही माझी शेवटची विनति मान्य कराच !"

 या कळवळ्याच्या भाषणास साक्रेटिसाने तितक्याच कळवळ्याने पण गंभीरपणाने उत्तर दिले. साक्रेटिस ह्मणाला 'प्रिय क्रिटो ! माझ्या सुटकेबद्दलची तुमची कळकळ जर चांगली असली तर ती बहुमोलाची होय खरी; परंतु जर ती वाईट असली तर मात्र फार भयंकर आहे ! मी आजपर्यंत कोणतीहि गोष्ट अविचाराने केली नाहीं; सुविचारास पटल्याखेरीज कोणतीहि गोष्ट करावयाची नाही असा माझा क्रम आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्या ह्मणण्याप्रमाणे आज माझ्यावर दुर्दैव ओढवल आहे म्हणून मी आतां सुविचाराची कास सोडणे रास्त होईल काय ? तेव्हां, तुह्मी ह्मणतां तसे वागणे हे नीतिदृष्टया चांगले आहे किंवा नाहीं याचा आपण पाहिजे तर पुनः विचार करून विचारांती जे चांगले ठरेल त्याप्रमाणे वागू; परंतु नुसत्या लोकांच्या मताला मान देण्याकरितां, किंवा दुसऱ्या कोणत्याहि कारणाकरितां, अयोग्य तऱ्हेने वागणे आपल्याला व आपल्या आजपर्यंतच्या उपदेशाला शोभणार नाही. खर्चाचा, मुलांच्या शिक्षणाचा, दुसऱ्या शहरांच्या आश्रय देण्याच्या उत्सुकतेचा, किंवा इतर

२६