पान:तीन तत्वज्ञानी.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

स करून इतक्या पहांटेस येण्याचे कारण विचारले, तेव्हां क्रिटोने डेलासला गेलेले गलबत आज येणार अशी दुःखदायक बातमी आली आहे असे मोठा सुस्कारा टाकून सांगितले. साक्रेटिसास ही बातमी ऐकून काहीएक वाईट न वाटतां उलट ही सुदैवाची बातमी आहे असेंच त्याला वाटले. परंतु तो म्हणाला " गलबत आज येईल असे मला वाटत नाही. कारण आतांच एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली सुंदर स्त्री माझ्या स्वप्नांत आली व ती मला म्हणाली:-

 "आज पासूनी तिसरे दिवशी जाशिल तूं यमलोकाला !' तेव्हां तुम्ही मला उठविले नाही हे चांगले केले; पण तुमचे येण्याचे कारण सांगा."

 क्रिटो मोठया कळकळीने बोलला " गुरुजी, मी आपल्याला किती तरी वेळा विनति केली आहे व आतां ही शेवटची करीत आहे. आपण आपल्या जीवाची उगाच आहुती घालीत आहां. या आपल्या करण्याने आम्ही आपल्या मित्रांनी आपली सुटका करण्याचा काही प्रयत्न केला नाही, असा आमच्यावर जनापवाद राहील. मी आपल्याला सांगतो की, मी आपल्या सुटकेची सर्व तयारी करून ठेविली आहे. तुरुंगावरच्या सर्व अधिकाऱ्यांची समजी केली आहे. या कामाला फारसा खर्च येतो अशांतला प्रकार नाही, व जरी माझी सर्व संपत्ति या कामी खर्च झाली तरी मी ती करण्यास एका पायावर तयार आहे. आपण आपल्या मित्राच्या साहाय्याने तुरुगांतून निघून गेल्यास आपल्या मित्रांना सरकाराकडून त्रास, दगदग व खर्च सोसावा लागेल, या भीतीने जर आपण माघार घेत असाल तर त्याबद्दल आपण अगदी बेफिकीर असा. आमचे आम्ही पाहून घेऊ! दुसऱ्या शहराचे लोक आपले आदरातिथ्य करण्यास व आपल्यास आश्रय देण्यास उत्सुक आहेत. सर्व व्यवस्था मी थेसलींत करून ठेविली आहे. आपला नुसता रुकार पाहिजे आहे. शिवाय,जीव जगविणे हातांत असतां तो जाणूनबुजून घालविणे हे पाप नाही का ? आणखी असें पहा, आपण सडे नाहीत आपल्याला मुलेबाळे आहेत; ज्यांचे संगोपन करणे व त्यांना शिक्षण देऊन उत्तम नागरिक बनविणे

२५