पान:तीन तत्वज्ञानी.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

खात्री युक्तिवादाने पटविली पाहिजे. आपली सुटका करून घेण्याचे दुसरे मार्ग-दयादि उत्पन्न करणें-हे न्यायाधिशाला व आरोपीला कमीपणा आणणारे आहेत. तेव्हां असल्या कमीपणा आणणाऱ्या मार्गाचा मी अवलंब करणार नाही व तुम्हीही कधी करूं नये, अशी आपल्याला विनंति आहे. तुम्ही खरा न्याय देण्याची शपथ घेतली आहे. तेव्हां तुमच्या दयेचा फायदा घेणे म्हणजे तुमची शपथ तुम्हांला मोडण्यास लावणे होय. मी असे केले तर मात्र देव नाही असेंच मी तुम्हांला शिकविल्यासारखें होईल व मेलीटसचा आरोप मी आपल्या वर्तनाने शाबीत केल्याप्रमाणे होईल! अर्थानियन नागरिक हो ! खरा प्रकार निराळा आहे. माझ्या प्रतिपक्षीयांचा सुद्धा नसेल असा माझा देवावर भाव आहे व माझा खटला मी तुमच्यावर व देवावर सोपवितो; म्हणजे त्याचा निकाल तुम्हांला व मला श्रेयस्कर असा होईल!

 सॉक्रेटिसाचे अशा तऱ्हेचे भाषण झाल्यावर सर्व न्यायाधिशांची मते घेण्यांत आली व सॉक्रेटिसाला २८१ विरुद्ध २२० मतांनी अपराधी ठरविले. नंतर अथीनियन कायद्याप्रमाणे वादीने आरोपीला कोणची शिक्षा द्यावयाची याबद्दल सूचना आणावयाची असते. त्याप्रमाणे साक्रेटिसाला मरणाची शिक्षा व्हावी अशी मेलीटसने सूचना आणली. आरोपीला दुसरी कमी दर्जाची शिक्षा सुचविण्याचा अधिकार असतो व ही शिक्षा सुचवितांना आरोपीने न्यायाधिशाशी नम्रपणाचे वर्तन करून त्याची करुणा भाकून आपल्या दुःखाचें प्रदर्शन केले म्हणजे न्यायसभेचे बहुतेक कमी शिक्षेला बहुमत पडत असे. त्याप्रमाणे साक्रेटिसाने गयावया केले असते, आपण मरणार याबद्दल त्याने दुःख प्रदर्शित केले असते, आपली मुले-बाळे आणून त्यांचे व आपल्या विपन्न स्थितीचे प्रदर्शन केले असते, तर त्याची थोड्या दंडावरही सुटका झाली असती. परंतु साक्रेटिसासारखा धीरगंभीर कर्तव्यपरायण साधुपुरुष अशी लाजिरवाणी गोष्ट कशी करील ? उलट त्याने आपले निरपराधित्व मोठ्या अभिमानाने सांगितले. आपण अथेन्सवर कसे उपकार केले आहेत हे त्याने दाखवून दिले

२१