पान:तीन तत्वज्ञानी.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितले. परंतु मित्राच्या मुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या समजुतीखातर साक्रेटिसानें तीस मिनींचा दंड देण्यास आपण कबूल आहो असे जाहीर केले.

 मते घेतल्यावर असे दिसून आले की, पहिल्यापेक्षां पुष्कळच जास्त मताने सॉक्रेटिसास मरणाची शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा ऐकून त्याला मुळीच वाईट वाटले नाही. मात्र आपल्याला अन्यायाने शिक्षा दिल्याबद्दल तुम्हांला पुढे पश्चात्ताप होईल असे सॉक्रेटिसाने भविष्य सांगितले.

 शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, " परंतु आतां वेळ झाली व आपण येथून निघाले पाहिजे, मी मरायला जाणार, आपण जगण्यास जाणार, पण आयुष्य जास्त चांगले किंवा मृत्यु जास्त चांगला, हे फक्त देवालाच ठाऊक ! ! !"

२२