पान:तीन तत्वज्ञानी.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

 " या डेलफाय देवाच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय ? असा मी विचार करू लागलो. मला तर मुळीच शहाणपण नाही, हे मला ठाऊक आहे. तेव्हां देवाच्या म्हणण्याचा अर्थ काय ? देव तर खोटे बोलणार नाही. कारण तो देवच आहे. शेवटी देवाचे म्हणणे खरे आहे की खोटें आहे याचा खालील पद्धतीप्रमाणे मी पडताळा पाहण्याचा निश्चय केला. शहाणपणाबद्दल अत्यंत नाणावलेल्या एका मुत्सद्याकडे मी गेलों व त्याला पूष्कळ प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्याशी संभाषण केले, त्यावरून मला असे समजले की, जरी त्याला सर्व लोक ज्ञानी समजतात, व तो आपल्या स्वतःलाही ज्ञानी समजतो, तरी पण तो अज्ञानी आहे व या अज्ञानाची त्याला जाणीव नाही. तेव्हां मी व तो या दोघांनाही ज्ञान नाही असे दिसले. मात्र माझ्या अज्ञानाची मला जाणीव होती, पण त्याला मात्र ती नव्हती. तेव्हां या बाबतीत मी त्याच्यापेक्षां शहाणा खरा, असें अनुभवास आले. पुढे मी एका कवीकडे गेलो. परंतु त्याला आपल्या कवितेबद्दल व आपल्या कवनपद्धतीबदल कांहींच ज्ञान नाही असे मला दिसून आले. तेव्हां मी ताडले की कवींना आपल्या कलेचे ज्ञान नसते, ते कविता करतात खऱ्या, परंतु त्या ज्ञानाने नव्हे तर साहजिक स्फूर्तीने करतात. पुढे मी कारागिरांकडे गेलो, त्यांना माझ्यापेक्षा जास्त शहाणपण असेल असे मला वाटले. त्यांना आपल्या कलेबद्दल व धंद्याबद्दल माहिती होती खरी, परंतु या एका प्रकारच्या ज्ञानावरून आपल्याला सर्व तऱ्हेचे ज्ञान आहे असे त्यांना वाटत असे. या बाबतीतही मी त्यांचेपेक्षां बरा, असे मला दिसून आले. याप्रमाणे देवाच्या जणुं कांहीं आशेनेच मी आपला व्यवसाय चालविला होता. परंतु यामुळे मी आपल्याला जास्त जास्त शत्रु करीत होतो. ज्याच्या ज्याच्या जवळ संभाषण करून मी त्याला कंठित करून त्याचे अज्ञान दाखवीत असे, तो तो मनुष्य आपल्या अज्ञानाला दोष न ठेवतां मलाच शिव्या देई. तरुण मंडळी हा वादविवाद पहात असत. तेव्हां त्यांना मी जास्त शहाणा आहे असे वाटे व माझ्या

-

१८