पान:तीन तत्वज्ञानी.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

आले असते तर फार चांगले होते. काही लोक आपल्याला मनुष्याच्या कर्तव्यकर्माचें ज्ञान करून देता येते अशी घमेंड मारतात व अशा तऱ्हेनें पुष्कळ पैसे मिळवितात व तरुण लोक यांचे पाठीमागे लागतात. परंतु मी अशा तऱ्हेची घमेंड मारली नाही किंवा कोणाकडून पैसेही मिळविले नाहीत!

 " पण आपणांपैकी कोणी तरी विचारील, 'अहो सकेटिस ! जर तुम्ही काहीच केले नाही असे म्हणतां तर मग तुमच्याबद्दल इतकी निंदा कां ? सामान्य लोकांमध्ये नाही असे काही तरी असाधारण तुमच्या वर्तनांत व तुमच्या पद्धतीत असल्याखेरीज तुमच्याविरुद्ध इतक्या कंड्या पिकतील कशा ? तेव्हां तुमचा खरा व्यवसाय काय तो आम्हांला सांगा. म्हणजे तुमच्या खटल्याचा आम्हांस योग्य निकाल करण्यास सांपडेल.' हा प्रश्न वाजवी आहे व माझ्याविरुद्ध इतक्या कंड्या का पिकल्या व माझें नांव इतके वाईट का झाले आहे याचे स्पष्टीकरण मी आतां करणार आहे. मी विनोदाने काही तरी सांगत आहे, असे समजू नका. मी अगदी सत्य तेच सांगत आहे. माझें नांव बहू होण्याचे कारण माझ्यामध्ये असलेले एक प्रकारचे शहाणपण होय. हे शहाणपण सर्व मनुष्यप्राण्यांस साध्य करून घेता येण्यासारखे आहे. परंतु या निराळे एखादें शहाणपण माझे अंगी नाही. माझ्या प्रतिपक्षीयांना असल्यास न कळे ! या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी डेलफाय देवाची साक्ष आणू शकेन. तुम्हांला चेरीफान ठाऊक आहे. तो तरुणपणापासून माझा सोबती होता. त्याने लोकांबरोबर जुलमी अमलात देशत्याग केला व लोकांबरोबरच तो परत आला. त्याचा स्वभावही तुम्हांला माहीत आहे. त्याने एखादी गोष्ट मनांत आणली म्हणजे ती तो शेवटास नेल्याखेरीज रहावयाचा नाही. त्याने एकदां डेलफाय देवाला प्रश्न विचारला की, 'सॉक्रेटिपेक्षां कोणी शहाणा आहे काय ?' देवाकडून उत्तर आले, 'नाही' ही गोष्ट खरी आहे याची साक्ष चेरीफानचा येथे हजर असलेला भाऊ दऊ शकेल."सा...२

१७