पान:तीन तत्वज्ञानी.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतो तें न्याय्य आहे किंवा नाहीं हे आपण पहा. कारण ज्याप्रमाणे खरे बोलणे हे वकिलाचे कर्तव्यकर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणे न्यायाधिशाचे काम आहे."

 माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाही, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे यांच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेही टाऊक नाहीत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाही. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.

 जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असे धरून मी त्यांचा आरोप आपल्याला सांगतो. ते म्हणतात, 'साक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य अहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचे व सत्याचे आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गेष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझें असेंच असत्य चित्र काढले आहे. परंतु अशा प्रकारचे ज्ञान मला मुळीच नाही! अशा प्रकारचे ज्ञान मनुष्यास मिळणे शक्य असल्यास ते वाईट नाही, परंतु असले ज्ञान मला नाही हे खास! माझी पुष्कळ भाषणे आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील. त्यांनी मी अशा विषयावर बोललो आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची मनोमय साक्ष पटेल.

 " तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें नाही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे ! असे जर मला करता

१६