पान:तीन तत्वज्ञानी.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.


वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचे शिक्षण तरुणांना बिघडविणारे आहे असें वादींचे म्हणणे होते. वादींनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाही हे कळण्यास साधन नाही. नंतर साक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचे भाषण अत्यंत साधे, पण अकृत्रिमवक्तृत्वपूर्ण होते. सॉक्रेटिस म्हणालाः-

 "अथीनियन नागरिकहो ! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाही. माझ्या संबंधाने विचाराल तर मी कोण आहे हे मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचे भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल ! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकी मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हैं:-त्यांनी तुम्हांला सांगितले की, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ चालीन ! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल की, माझ्यांत मुळीच वक्तृत्व नाही ! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी ! या अर्थाने मी कबूल करतों की, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेने शृंगारलेले नाटकी भाषण करणे मला आतां शोभत नाही. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाही. मला जे आयत्या वेळी शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशी मी अगदी अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणे तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलू द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलू द्यावे अशी विनंति आहे. माझी बोलभाची भाषाशैली कशी आहे- ती चांगली असेल अगर वाईट असेल -