पान:तीन तत्वज्ञानी.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.

 येथपर्यंत सॉक्रेटिसाचे सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितले. आता त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणे 'सॉक्रेटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नावाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपाने 'गोल्डन ट्रेझरी सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत, ज्याप्रमाणे कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिले असते तरी त्याची कविकुलगुरूंमध्ये गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेलें आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणता येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथाने अजरामर झाली असती. प्लेटोने या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचे अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणाऱ्या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.

 साक्रेटिसासारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावे, हे सकृद्दर्शनी फार विसंगत दिसते. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टीत फारसे आश्चर्य नाही, असेच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचे हृद्गत जनतेसः

११