पान:तीन तत्वज्ञानी.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेते उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करणे हे फार पवित्र कर्तव्यकर्म समजत असत. विजयी सेनापतीच्या हयगयीमुळे व कर्तव्यपराङ्मुतेमुळे आपले पुष्कळ नातलग गमावले व विशेषतः मृतांचा धार्मिक प्रेतसंस्कार करणे अशक्य झाले, हे पाहून अथीनीयन जनता खवळली व कांही लोकांनी लोकसभेत सेनापतीवर कर्तव्यकसूरीबद्दल आरोप आणला. फार मोठे वादळ झाले होते म्हणून त्या वेळी माणसे पाठविणे म्हणजे त्यांचेच जीव धोक्यांत घालण्यासारखे होते, असें एकदा त्यांच्या बाजूने सांगण्यांत आलें. तर दुसऱ्यांदा ही कामगिरी दोन कामगारांकडे सोपविली होती परंतु त्यांनी कामचुकारपणा केला म्हणून त्यावर उलट आरोप सेनापतीच्या तर्फे करण्यांत आला. तरी अर्थीनोयन लोक शांतपणे ऐकून घेत होते व त्यांच्यावरील आरोपाचा विचार न्यायसभेत करण्याचे ठरले होते; परंतु इतक्यांत एक अथेन्समधील सांवत्सरिक कौटुंबिक समारंभ झाला व त्या वेळी किती तरी कुटुंबांतील किती तरी कर्ते पुरुष नाहीसे झालेले आहेत असे दिसून आले. लोकांचा क्षोभ व्हावा म्हणून काहीजण सुतकाचा पोषाख करून या समारंभांत आले होते. या सर्व देखाव्याने लोकांच्या मनाचा क्षोभ झाला व पहिले पारडे फिरले व न्यायासनासमोर न नेता सर्व सेनापतींच्या वरील आरोपाचा एकदम व एका लोकसभेतील बहुमताने निकाल करावा, अशी सूचना सभेपुढे आली. आळीपाळीने एकएका गोत्रांतील अध्यक्ष करण्याच्या रीतीप्रमाणे सॉक्रेटिसाची अध्यक्षाची पाळी त्या दिवशी आली होती. ही सूचना उघड उघड गैरकायदा होती. अशी गैरकायदा सूचना मी साफ सभेपुढे ठेवणार नाही, असें साक्रेटिसाने निक्षून सांगितले. त्याला लांच देऊ केला, मरणाचे भय घातले, नाना प्रकारांनी विनवण्या केल्या. लोक अगदी खवळलेले होते. तरीसुद्धां सॉक्रेटीस डगमगला नाही किंवा सत्यापासून पराङ्मुख झाला नाही. साक्रेटिसाच्या या नीतिधैर्याचा