पान:तीन तत्वज्ञानी.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

व नेहमींच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणाऱ्या शपायापेक्षा जास्त जोराने चाले."

 दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्याने लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावे लागले, तरी तो इतक्या धिमेपणाने व अभयमुद्रेने परतत होता, की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यात आले की, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता.

 साक्रेटिस जीत इजर होला अशी तिसरी लढाई अम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत बेसिडास नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीआन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि साक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाही व अखेरपर्यंत तो लढत होता.

 हे झाले लढाईतील धैर्याचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हे स्वाभाविक आहे. बाकी साक्रेटीस राजकीय उलाढालींत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून त्याला नेहमी परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोक सत्तात्मक असल्या मुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांही काही अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेत काम करावे लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागले. तो प्रसंग असा.:-

 खिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आर्जीनौझी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागले, विजयी सेनापतीनी नासधूस झालेल्या काही गलबतां