पान:तीन तत्वज्ञानी.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

व खऱ्या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्वकर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणे बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्याकडे किंवा घरी जाऊन जेवावें व पुनः बाहेर पडावे व मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी व जेथे जेथें मनुष्ये आढळतील तेथे तेथे त्यांच्याशी संभाषण करीत रात्रपर्यंत वेळ घालवावा व रात्री कोणाकडे जेवावे किंवा घरी जेवणास यावे. केव्हां केव्हां साकेटीस आपल्या स्नेहीमंडळीस घेऊन घरी एकाएकी जेवावयास येई; परंतु घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे व सॉक्रेटिसाचे लक्ष्य संसाराकडे मुळीच नसल्यामुळे आणि तो घरची व्यवस्था मुळींच पहात नसल्यामुळे त्याची बायको अशी मंडळी अकस्मात् आली व त्यांची जेवणाखाणाची तरतूद करण्यास धान्यधून्य नसले म्हणजे सॉक्रेटिसावर फार रागावे, परंतु साक्रेटीस उलट न रागावतां उत्तर देत असे " इतके वाईट वाटण्याचे कारण नाही, जर आपले स्नेही समजूतदार असतील तर त्यांना आपली स्थिति ठाऊक असल्यामुळे मिळेल त्यांत ते समाधान मानून घेतील, परंतु ते जर हलकट लोक असतील तर त्यांच्याबद्दल आपण फारशी फिकीर करूं नये."

 झांटिपी व साक्रेटीस यांच्या संसारांतील झगड्याच्या पुष्कळ गोष्टी मागाहून झालेल्या लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, परंतु त्यांपैकी विश्वसनीय किती आहेत हे आतां सांगणे कठीण आहे, एक तुकारामाच्या एका दंतकथेसारखी आहे तेवढी येथे सांगतो. संसारासंबंधीच्या कटकटी वरून एके वेळी झाँटिपी ही सॉक्रेटिसावर फार रागावली व तिने साकेटिसावर शिव्याशापांची लाखोली वाहिली व इतक्याने तिच्या रागाचा उपशम न होऊन तिने साक्रेटिसाच्या डोकीवर पाण्याची घागर आणून ओतली, परंतु या सर्व गोष्टींनी साक्रेटिसाची शांत वृत्ति किंचित् सुद्धा ढळली नाही, तो स्मित करून म्हणाला, "इतक्या भयंकर गडगडाटानंतर पाऊस आला हे स्वाभाविकच आहे !"

 वरील वर्णनावरून सॉक्रेटिसाच्या एकंदर आयुष्यक्रमाची सामान्य कल्पना वाचकांस आलीच असेल, साक्रेटिसाचे आयुष्य विचार करण्यांत