पान:तीन तत्वज्ञानी.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

करवितो. अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मानसिक श्रमाने मी त्यांचे ज्ञान वाढवितो. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाही, कारण, ते माझ्याजवळच नाही."

 साक्रेटिसाला अथेनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेले होते. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून काही मूर्ति त्याच्या मरणानंतर बऱ्याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच साक्रेटीसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला. व हच त्याचे आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व ते त्याने सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपणीं सॉक्रेटिसाला अनझगोरास या तत्त्वज्ञान्याच्या लेखांनी सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाही अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगू लागली व तेव्हांपासून त्याचा उपदेशाचा व्यवसाय जास्त जोराने सुरू झाला.

 सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्यासारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रेटिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्षे सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे.व मोठमोठ्या चव्हाट्यावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉकेटीस त्यांना दाखवून देई