पान:तीन तत्वज्ञानी.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

"ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी' अशी स्थिति होती: दोघेही खरे भगवद्भक्त होते; दोघांनाही दांभिकपणा व कर्मठपणा यांचा संताप येत असे व दोघेही या दांभिकपणाचा भीडभाड न ठेवतां स्फोट करीत असत. या मनोघटनेप्रमाणेच दोघांच्या परिस्थितीत व बाह्य गोष्टींतही साम्य दिसते. दोघेही आपापल्या देशांत कमी दर्जाच्या मानलेल्या गरीब कुलांत जन्मलेले होते; साक्रेटीस हा एका पाथरवटाचा मुलगा होता, तर तुकाराम हा एका वाण्याचा मुलगा होता; दोघेही आपल्या अंगच्या गुणांनी ' नर करणी करे तो नरका नारायण हो जाय' या म्हणीप्रमाणे साधुत्व पावले होते; दोघांचीही घरची फार गरीबी होती; दोघांचीही राहणी अत्यंत साधी होती; दोघेही वासनाच्छेदांत आनंद मानीत व दोघेही सुखसोई, ख्यालीखुशालीबद्दल बेपर्वा व बेफिकीर असत; दोघेही प्रापंचिक होते व आमरणांत प्रपंचापासून बाह्यतः पराङ्मुख झाले नाहीत; दोघांनाही बायकामुले होती; दोघांच्याही बायका खाष्ट त्राटिका होत्या; साक्रेटिसाच्या बायकोचें नांव झांटिपी असे होते व या कजाग बायकोमुळे 'झांटिपी' हा शब्द कैकेयी प्रमाणे सामान्यनाम झालेला आहे; दोघांचाही तत्कालीन लोकांकडून बराच छळ झाला, सॉक्रेटिसाला तर या छळापायीं विषप्राशन करून मरणाची शिक्षा भोगावी लागली; दोघांच्याही सदुपदेशाचा व त्यांच्या उज्ज्वल चरित्राचा प्रकाश त्यांच्या पश्चात् वृद्धिंगत होत गेला.

 तरी पण दोन गोष्टींमध्ये या साधु पूरुषांत फार मोठा भेद आहे. 'पहिली गोष्ट त्यांच्या लेखांसंबंधी होय. सॉक्रेटिसा ने आपले विचार कधीही कागदावर नमूद केले नाहीत. संभाषणाच्या ओघाने जे जसे विचार येतील तसे ते प्रगट करावयाचे असा त्याचा परिपाठ असे. सॉक्रेसाने चाळीस वर्षे सतत लोकशिक्षणाचे काम केले. परंतु ते सर्व आपल्या मोहक वाक्प्रवाहाने केले. सॉक्रेटिस कोठेही संभाषण करो, त्याच्या भाषणांत हास्यविनोदादि सर्व प्रकारचे रस असल्यामुळे अथेन्समधील सर्व लोक, विशेषतः तरुण मंडळी, त्या भाषणाकडे आकर्षिली जात असे. परंतु