पान:तीन तत्वज्ञानी.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

ताराच झाला आहे. ज्याप्रमाणे कितीही मोठ्या शक्तीची दुर्बीण घेतली तरी जोडताऱ्याच्या प्रकाशाचे पूर्ण विभक्तीकरण करता येत नाही, त्याप्रमाणेच प्लेटोच्या ग्रंथांवरून साक्रेटिसाचे विचार व प्लेटोचे विचार यांचे पूर्णपणे विभक्तीकरण करणे अशक्य झाले आहे. तरी पण प्लेटोनें आपल्या गुरूच्या चरित्रांतील प्रसंगांचे व विशेषतः त्याच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचे इतके हुबेहूब व इतके हृदयंगम चित्र रेखाटले आहे की, घडलेल्या गोष्टी तीन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत तरी त्या आजकाल घडल्यासारख्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात व तें वर्णन वाचतांना मनुष्याच्या डोळ्यांतून टिपे पडल्याखेरीज रहात नाहीत. म्हणून व कालानुक्रमानेही तो सर्वांत जुना तत्त्वज्ञानी आहे म्हणून तीन तत्त्ववेत्त्यांच्या या चरित्रमालेत साक्रेटिसाला आम्ही अग्रपूजेचा मान दिला आहे.

 सॉक्रेटीस हा खिस्ती शकापूर्वी ४०० वर्षांखाली ग्रीस देशांत एक मोठा तत्त्वज्ञानी व साधु पुरुष होऊन गेला, चमत्काराची गोष्ट अशी आहे की, इतक्या जुन्या काळांत होऊन गेलेल्या या महापुरुषाच्या मनोघटनेत व बऱ्याच अलीकडे आपल्या इकडे होऊन गेलेला महासाधु पुरुष तुकाराम याच्या मनोघटनेत विलक्षण साम्य आहे. ते इतके की, थिआसफीसंबंधाच्या पुस्तकाच्या सतत वाचनाने सुलभश्रद्धा अशी जी मनाची स्थिति होते तशी आमच्या मनाची स्थिति असती तर येवढ्या साम्यावरून आम्ही बेधडक असे विधान केले असते की, साक्रेटिसाच्या आत्म्याने आपली अधिकतर आत्मोन्नति करून शेवटीं मोक्ष मिळविण्याकरतांच हिंदुस्थानच्या धर्मभूमीत अवतार धारण केला ! परंतु आमची मनःस्थिति इतकी सुलभश्रद्धा नसल्यामुळे असे विधान आमच्याने करवत नाही. परंतु इतके मात्र खरे की, तुकाराम व साक्रेटीस यांचे मनोघटनेंतच नव्हे तर त्यांच्या परिस्थितीतही विलक्षण सादृश्य दिसून येते. दोघेही मोठे साधू पुरुष बनले; दोघांची स्वार्थबुद्धि पूर्णपणे गळाली होती; दोघांनाहीं परोपकार व लोकहित यांशिवाय अहर्निश दुसरा व्यवसाय नव्हता; दोघांनीही आपले सर्व आयुष्य लोकशिक्षणांत घालविलें; दोघांचीही