पान:तीन तत्वज्ञानी.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

येवढेच फार तर सिद्ध होते; म्हणजे सृष्टीचे मूळ द्रव्य अनादि व स्वतंत्र मानावे लागते; परमेश्वर फक्त त्या जडद्रव्याची चतुराईने मांडणी करतो इतकेंच दिसून येते.

 याप्रमाणे तत्त्वज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेर आहे असें कँटनें दाखविले आहे. मानवी ज्ञानाच्या योगाने विवेकशक्तीला ' आत्मा, सृष्टीचे केवळ स्वरूप व परमेश्वर' या कल्पना सुचतात खऱ्या व या कल्पनांचा 'ज्ञानाचे ध्येय' म्हणून उपयोग आहे खरा. पण या कल्पना अतीन्द्रिय असल्यामुळे त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही, या विवेचनालाच कँटचा बौद्धिक अज्ञेयवाद म्हणतात.

 अर्थात् बुद्धीने तत्त्वज्ञान शक्य नाही असा कँटचा सिद्धांत आहे, पण बुद्धीखेरीज मानवी इतर शक्तीने या अतीन्द्रिय गोष्टीबद्दल डोळसश्रद्धा उत्पन्न होणे शक्य आहे. ती कशी उत्पन्न होते हे सांगणे म्हणजेच कँटच्या नव्या तत्त्वज्ञानाचा मथितार्थ सांगणे होय. तरी आतां शेवटी तिकडे वळू.

 कँटच्या नव्या तत्वज्ञानाचा उल्लेख त्याच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथाचे शेवटी आला आहे खरा; व तेथे त्याने या तत्वज्ञानाची रूपरेखा दिली आहे खरी; तरी पण त्या तत्वज्ञानाचे त्याच्या पुढच्या परीक्षणात्मक ग्रंथांत सविस्तर विवरण आलेले आहे. त्याच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथाचा शेवट अज्ञेय वादांत होतो खरा; पण कँट येथेच थांबत नाही. आपल्या ज्ञानांने सूचित केलेले आत्मा' 'परमेश्वर ' इत्यादि प्रश्न आपल्या बुद्धीला सुटले नाहीत तरी ते मानवी मनाच्या इतर शक्तींच्या आवाक्याबाहेरचे आहेत अशांतला भाग नाही; असें कँटचे म्हणणे आहे व हा मुद्दाच त्याने आपल्या पुढील परीक्षणात्मक ग्रंथांत प्रमुखपणे पुढे आणला आहे.

 त्याच्या दुसऱ्या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय सद्सद्विवेकशक्ती हा होय. मनुष्याला पुष्कळ वासना आहेत; त्यामुळेच मनुष्य प्रवृत्ति पर बनून वर्तन करतो. पण पशुप्रमाणे मनुष्याचे वर्तन केवळ वासनावर

११०