पान:तीन तत्वज्ञानी.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

संवेदना होय. व ह्यूमनें म्हटल्याप्रमाणे आत्म्याची आपल्याला संवेदना होत नाही. म्हणून तत्वज्ञानाचा हा भाग म्हणजे निवळ एक मानवी बुद्धीची घोडचूक होय. आपल्याला आत्मज्ञान नाही, म्हणून आत्म्याचें अमरत्व किंवा जडराहित्य किंवा अणुत्व वगैरे प्रश्न मानवी ज्ञानाच्या आटोक्याबाहेरचे आहेत.

 बाह्य सृष्टीचे जे आपल्याला ज्ञान होतें तेंहि अर्थात् संवेदनात्मक असते म्हणून आपल्याला बाह्य सृष्टीचे केवल स्वरूप कळणे शक्य नाही. विवेकवादीपंथाने असें ज्ञान होते असे प्रतिपादन केले आहे खरे, पण संवेदनावादीपंथाने त्यांचे म्हणणे खोडून काढले आहे. कँटचे म्हणणे असे की, या परस्परविरोधी विधानांवरून हहि ज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ बाह्य सृष्टि ही मर्यादित आहे किंवा अमर्यादित आहे ह्यासंबंधी वाद आहे. दोन्ही विधाने प्रमाणाने सिद्ध करतां येतात. परंतु कँटचे मते आपल्याला बाह्य सृष्टीचें निश्चित ज्ञान होणे शक्य नाही. कारण अवकाश ही जर सृष्टिज्ञानाची एक आवश्यक अट आहे तर आपल्याला ह्य सृष्टीची मर्यादा संपली किंवा ती मर्यादा कींहि संपणार नाही असे म्हणता येत नाही. या दोन्ही स्थिति अतींद्रिय आहेत व आपल्या बुद्धीला अतींद्रियज्ञान होऊ शकत नाही. तसेंच बाह्य सृष्टि विभाज्य आहे किंवा अविभाज्य आहे, म्हणजे तिचे परमाणू आहेत किंवा नाहीत हे निश्चयाने सांगता येत नाही. कारण ही स्थिति अतींद्रिय आहे. असो.

 आतां परमेश्वराची कल्पनाही अतीन्द्रिय आहे. म्हणूनच तो मानवी बुद्धीला अज्ञेय आहे. कारण परमेश्वर म्हणजे सर्वगुणसंपन्न व कारणरहित सृष्टीचे कारण होय. पण गुण हे आपल्याला संवेदनांनी कळतात तेव्हां सर्वगुणसंपन्नता कळणे शक्य नाही. कारण ती अतीन्द्रिय आहे. तसेच आपल्या बुद्धीला कारणरहित कारण कळणे शक्य नाही. कारण आपल्या बुद्धीला जें जें कळते त्याला त्याला कार्यकारणभाव लागू

१०८