पान:तीन तत्वज्ञानी.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


ज्ञानाचे एक अंग आहे. त्या अंगाला बुद्धीच्या व्यापाराची जोड झाल्या खेरीज त्याला ज्ञानरूप प्राप्त होत नाही. तेव्हां बुद्धीचे अंग ज्ञानाला आवश्यक आहे व ज्ञान हे संवेदना व विचार (बुद्धीचे कार्य) यांच्या संयोगापासून होते असे कँटने प्रतिपादन केले आहे व प्रथमतः संवेदनांत बुद्धीचा अंश कसा आहे हे पहिल्या भागांत दाखवून दिले आहे.

 बाह्य पदार्थोपासून इंद्रियद्वारा आपल्याला संवेदना होतात असे आपण म्हणतो. या संवेदना एकसमयावच्छेदेंकरून किंवा एकामागून एक अशा आपल्या मनावर येतात. तसेच त्या बाहेरून,दुरून,जवळून, मागून, पुढून, खालून, वरून, उजवीकडून, डावीकडून येतात. आतां एकसमयावच्छेदकता व आनुपूर्य यांमध्ये काळाची कल्पना अन्तर्भूत झालेली आहे व बाह्यता यामध्ये अवकाश, दिशा या कल्पनेचा अन्तर्भाव झालेला आहे. म्हणजे दिक् व काल या संवेदना नव्हत, तर संवेदना मानवी मनाला मिळण्याच्या या अटी आहेत. जर मानवी मनाला संवेदना व्हायच्या असतील तर त्या अवकाश व काल याशिवाय होणार नाहीत. अवकाश व काल ही जणूं कांही मानवी मनाने उत्पन्न केलेली वस्तूंची आवरणे होत. बाह्य वस्तूचे ज्ञान या आवरणांतूनच आपल्याला व्हावे अशीच आपल्या मनाची घटना आहे. म्हणजे अवकाश व काल या संवेदना नव्हत. कारण संवेदना भासण्यास त्यांची जरूरी आहे व त्या वाह्य वस्तुही नव्हत. कारण त्या सर्वव्यापी आहेत तेव्हां अवकाश व काल ही मानवी बुद्धीचा मानवी ज्ञानाला लागणारा वाटा आहे. आतां गणितशास्त्र, अवकाश काल व (पुढे विवेचन करावयाची कल्पना संख्या व परिमाण) संख्या या गुणत्रयीचे शास्त्र आहे हे सर्वसंमत आहे. या शास्त्रांत नवी नवी सत्ये व सिद्धांत आपण सिद्ध करतो तें अनुभवाने किंवा प्रयोगाने करीत नाही तर तें विवेकाने एका खोलीत बसून सिद्ध करतो; तरी पण हे आपल्या विवेकाने सिद्ध केलेले सिद्धांत सर्व ज्ञात-अज्ञात बाह्य सृष्टीतील पदार्थाना लागू असले पाहिजेत, असे आपण खात्रीने सांगू शकतो. सारांश, गणितशास्त्र शक्य आहे. कारण जरी ते केवळ विवेकाने सिद्ध केले जाते.

१०३