पान:तीन तत्वज्ञानी.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

संबंध उत्पन्न होत नाही; तर जो कल्पनासंगतीच्या तत्वानुरूप आपल्या केवळ मनांत उत्पन्न होतो. तेव्हां आपल्याला संवेदनांनी जे बाह्य सृष्टीचे ज्ञान होते ते अगदी विस्कळीत असते. त्यांत संबंधकल्पना येत नाही. म्हणून कार्यकारणाची भावना हा निवळ मानवी कल्पनेचा भ्रम आहे. त्यांत सत्यांश मुळीच नाही. याप्रमाणे ह्यूमने कार्यकारण भावाच्या कल्पनेवर घाला घातला व ती कल्पना भ्रममूलक आहे असे दाखविले. या योगें कार्यकारण भावाच्या तत्वावर उभारलेली सर्व आधिभौतिक शास्त्रांची इमारत पार ढासळली. ह्यूमच्या मताप्रमाणे पदार्थत्रय संशयास्पद झाले; कार्यकारणभाव भ्रमरूप झाला. अर्थात् शास्त्राचा सर्व पायाच गेला व अशा तऱ्हेनें ह्यूमने संवेदनावादाचा संशयवादांत शेवट करून दाखविला.

 मानवी मनाला ज्ञान असाध्य आहे व म्हणूनच संशयवाद खरा ही कल्पना कँटच्या मनाला मुळीच सहन होईना. तरुण वयापासून त्याचा सर्व भर आधिभौतिक शास्त्रांवर, ती शास्त्रेही ह्युमच्या तत्वज्ञानाने जेव्हां विलयास जाऊ लागली, तेव्हां कॅटचे मन गोंधळून गेले. त्याची मनोदेवता त्याला सांग की गणित व भौतिक शास्त्र या द्वयीमध्ये तरी सत्य ज्ञान आहे खास. पण तत्वज्ञानाच्या पंथाप्रमाणे तर या नावर पाणी सोडण्याची पाळी आली. तरी पूर्वीच्या तत्वज्ञानाची कोठे तरी भयंकर भूल होत असली पाहिजे असे कॅटच्या मनाने घेतले. व म्हणूनच त्याने तत्वज्ञानाचा प्रश्न मूळापासून स्वतंत्रपणे सोडविण्याचा निश्चय केला व त्या निश्चयाचे फळ म्हणजेच कॅटचे परिक्षणात्मक तत्वज्ञान होय. तेव्हां आतां त्या कॅटच्या तत्वज्ञानाकडेच आपण वळणे बरे.

१००