पान:तीन तत्वज्ञानी.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

ज्ञानाचा विशेष म्हणजे त्यांत मानवी मनाच्या विवेकावर सर्व भर टाकलेला आहे. म्हणूनच डेकार्ट हा विवेकवादाचा जनक बनला.

 डेकार्टचे तत्त्वज्ञान स्पायनोझा याने परिपूर्णतेस आणिलें. साधारणतः यासारख्याच मतांचा पुरस्कार लायबनिट्स या जर्मन तत्त्वज्ञान्याने केला व लायवनिटझच्या मतांचा व्यवस्थित संग्रह वुल्फ या तत्त्वज्ञान्याने केला व हेच तत्त्वज्ञान कँटच्या काळी जर्मन युनिव्हर्सिटींत प्रचलित होते. हे मागे एकदां सांगितलेच आहे.

 बेकनने प्रारंभ केलेल्या संवेदनावादाकडे आता वळणे जरूर आहे. बेकन हा तत्त्वज्ञानी म्हणून फारसा प्रसिद्ध नाही. संवेदनावादाचा खरा पुरस्कर्ता लॉक हा इंग्रज तत्त्वज्ञानी होय. त्याने सर्व ज्ञान संवेदनांनी मिळते असे प्रतिपादन केले. विवेकशक्तीचाही त्याने उल्लेख केला आहे. पण ज्ञानाच्या बाबतीत विवेकाचे काम गौण आहे असे त्याचे म्हणणे आहे. सर्व ज्ञानाचें मूळ संवेदनांत आहे. संवेदनांनी काही ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाच्या संयोगाने आणखी ज्ञान विवेकाला काढता येईल. पण सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे असे लोकचे म्हणणे आहे. त्याचे मतें प्रारंभी मानवी मन कोऱ्या कागदासारखे असते. त्यावर संवेदनांनीच प्रथमतः संस्कार होतात व त्यांपासून मग पुढे विचार बनतात. डेकार्टप्रमाणे लॉकही सृष्टीत तीन पदार्थ आहेत असे मानीत असे. इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांनी आपल्याला बाह्य सृष्टि कळते. म्हणजे बाह्य सृष्टीचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे. आत्म्याचे ज्ञान आपल्या सर्व जाणीवेत व संवेदनांत प्रतीत होते असे डेकाटप्रमाणेच लाक म्हणे. ईश्वराचे ज्ञान आपल्याला अनुमानाने होते असे तो म्हणे; ते येणेप्रमाणे:--

 ही सृष्टि व मानवी प्राणी ही कार्ये होत. आतां या कार्याना कोणी तरी कर्ता पाहिजे व तो कर्ता सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असा असला पाहिजे. तो अर्थात् परमेश्वरच होय. लॉकच्या पुढची संवेदनवादाची पायरी बार्क्लेनें गांठलो. त्याने तर सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे व म्हणून बाह्य जगच मुळीं मानतां येत नाही असे दाखविले. पण या पुस्तकांत

९८