पान:तीन तत्वज्ञानी.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

महत्त्वाचा बनला. या मानवी ज्ञानाची मीमांसा बेकन व डेकार्ट या दोन तत्त्वज्ञान्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केली.

 बेकन संवेदनावादाचा जनक बनला. त्याचे मते मनुष्याचे सर्व ज्ञान त्याला इंद्रियद्वारा होतें, बाह्य पदार्थाचे प्रतिबिंब आपल्या इंद्रियांवर पडते. इंद्रिये मनावर संवेदना उत्पन्न करतात व या संवेदनांनी सत्य ज्ञान होते. मानवी मन हे आरशासारखे आहे. आरसा ज्याप्रमाणे स्वच्छ व मलरहित असला म्हणजे त्यावर पदार्थाचें प्रतिबिंब यथार्य उठते, त्याचप्रमाणे मनामध्ये पूर्वग्रह-कल्पनाशक्तीने किंवा केवल विवेकाने उभारलेले विचार-नसले म्हणजे संवेदनांचा ठसा मनावर यथार्थ उमटतो. तरी सृष्टिज्ञानाला शुद्ध व निर्विचार मन पाहिजे. मानवी कल्पना शक्तीने व विवेकशक्तीने उत्पन्न केलेले विचार हे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहेत, असे बेकनने म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे कोळी आपल्याच अंगापासून चीक काढून त्याच्या धाग्याचे सुंदर जाळे बनवितो, पण ते एका फुकरासरसें तुटून जाते, त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीने व केवळ विवेकशक्तीने उभारलेले विचारांचे डोलारे अनुभवाने मोडले जातात, सारांश, बेकनच्या मते मानवी मनाची संवेदनशक्ति हीच खरें ज्ञान देणारी शक्ति होय. कल्पनाशक्ति व विवेकशक्ति या ज्ञानाभास देणाऱ्या शक्ति होत. तरी मनुष्यांनी पहिल्या शक्तीवर विसंबले पाहिजे; तर मनुष्याला सत्यज्ञान होईल. या मताच्या योगे बेकन हा संवेदनावादाचा जनक बनला.

 डेकार्ट या फ्रेंच तत्त्वज्ञ न्याने दुसराच पंथ काढला, मला कोणत्या गोष्टीचे खात्रीचे ज्ञान आहे ? या प्रश्नापासून त्याने तत्त्वज्ञानाला सुरवात केली. त्याचे मते आपली इंद्रिये आपल्याला फसवितात; कारण ती पुष्कळ वेळां ज्ञानाचा आभास मनांत उत्पन्न करतात. आपल्याला दृष्टिभ्रम होतो, श्रुतिभ्रम होतो. तेव्हां बाह्य सृष्टीचे खरे ज्ञान आपल्याला होत नाही. तसेंच गणितशास्त्रांतील प्रमेयें तरी खरी कशावरून असा आपल्याला संशय येतो. सारांश; ज्ञानासंबंधी आपण विचार करू लागलों म्हणजे 'मला सर्व गोष्टींबद्दल संदेह वाटतो' अशा विधानाला आपण येऊन पोचतो.

९६