पान:तीन तत्वज्ञानी.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट



असेल तर ते अनुभव व संवेदना यांनी दिलेले आधिभौतिक शास्त्रांतील ज्ञान होय अशी त्याची दृढ श्रद्धा होती. अशा मनःस्थितीत असतां इंग्रजी तत्ववेता ह्यूम याचे संशयवादी पंथ कॅटचे हाती पडले, ह्यूमनें आपल्या ग्रंथांत अनुभव व संवेदन या ज्ञानाच्या आधाराचे दोष दाखवून मानवी प्राण्याला कोणतेंहि ज्ञान शक्य नाही व म्हणून संशयवाद शेवटी शिल्लक राहतो असें प्रस्थापित केले होते. हे ग्रंथ वाचून 'आपण श्रद्धेच्या झोपेतून जागे झालो' असे कँटने म्हटले आहे. मानवी प्राण्याला ज्ञान मिळविणे शक्य आहे व गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांमध्ये सत्य ज्ञान आहे अशी कँटची मनोदेवता त्याला सांगत होती. ह्यूमचे म्हणणे खरें धरले तर सर्व ज्ञान टाकाऊ ठरते. तेव्हा हे गौडबंगाल काय आहे; तत्त्वज्ञान्यांची कोठे तरी मोठी घोडचूक होत असावी; तेव्हां ती घोडचूक शोधून काढणे-गणित व आधिभौतिक शास्त्रांच्या समर्थनार्थ तरी-आवश्यक असे कँटला वाटून त्याने तत्त्वज्ञानाचा प्रश्न हाती घेऊन त्याचा आरंभापासून तलास लावण्याचा विडा उचलला व त्याचेच फल म्हणजे कॅटचे परीक्षणात्मक तत्त्वज्ञान होय. म्हणूनच कँटचे तत्त्वज्ञान समजण्यास युरोपच्या अर्वाचीन काळच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाची थोडीशी तरी माहिती असणे अवश्य आहे. तरी या तत्त्वज्ञानाचे येथें किंचित् सिंहावलोकन करूं.

 युरोपांतल्या अर्वाचीन युगाला, विद्येच्या पुनरुज्जीवनापासून सुरवात झाली. त्या पूर्वीच्या काळाला मध्ययुग किंवा अज्ञानयुग म्हणतात. या विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या योगें युरोपांत सर्व शास्त्रांची झपाट्याने प्रगति होऊ लागली, त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचाही उद्भव झाला. मनुष्याला ज्ञान मिळणे शक्य आहे काय ? हाच तत्त्वज्ञानाचा मुख्य प्रश्न पुढे आला. कारण मध्ययुगीन कल्पनेप्रमाणे बायबल व मान्य केलेले इतर ग्रंथ यांपलीकडे ज्ञानच नाही; मानवी बुद्धीचे काम म्हणजे या ग्रंथांचे विवेचन करणे इतकेच आहे; मानवी बुद्धीला नवीन ज्ञान होणे शक्य नाही, अशी मध्ययुगीन लोकांची समजूत होती. विद्येच्या पुनरुज्जीवनाने या समजुतीला जबरदस्त धक्का बसला व म्हणूनच मानवी ज्ञानाचा प्रश्न

९५