पान:तीन तत्वज्ञानी.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

वेळी लपीने हटकून ही चुकी करावयाची, व कँटने त्याचेकडून संथा घेववावयाची ! हा क्रम कित्येयकतरी वर्षे चालला होता. तरी शेवटपर्यंत लँपांच्याने चूक सुधारली नाही व कँटलाहि या संथा देण्याचा कंटाळा आला नाही.

 आतां कँटच्या चरित्रांतील बाह्यांग सोडून अंतरंगाकडे वळू या. कारण कॅटचे सर्व चारत्र मुळी चिन्मय आहे. त्याचे अवतारकार्य मनुष्यामध्ये विचारक्रांति करण्याचे होते, व ते त्याच्या लेखांनी पूर्णपणे घडवून आणले. कँटला सत्यज्ञानाची फार आवड होती. लोकांमधील अंधश्रद्धा नाहींशी होऊन लोक विचारी व सदाचरणी व्हावे, असाच त्याचा हेतु होता. त्याच्या नीतिविषयक ग्रंथांचा परिणाम लोकमतावर फारच झाला त्याचकाळी युरोपमध्ये सुखलालसा व विषयसुखेच्छा फार झाली होती, मनुष्याची इतिकर्तव्यता म्हणजे सुख मिळविणे, अशा प्रकारचे विचार फार पसरलेले होते. त्याविरुद्ध कॅटच्या लेखांचा रोख होता. मनुष्याने सुखेच्छा सोडून सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे करावे, असे कँटचे मत होते. कर्तव्य कर्तव्यबुद्धीने केले पाहिजे, हीच मानवी इतिकर्तव्यता, असे तो प्रतिपादन करीत असे,व कँटचा आयुष्यक्रम या त्याच्या मताप्रमाणेच असे. 'बोले तैसा चाले' या कोटीपैकी कँट हा होता. त्याला भितरेपणा हा ठाऊकच नव्हता ! जे आपल्याला योग्य वाटेल तें स्पष्टपणे बोलण्यास व लिहिण्यास तो कधीच कचरत नसे. ईश्वर वर त्याचा भरंवसा होता, परंतु कर्मकांडावर त्याचा मुळींच विश्वास नसे. तो प्रार्थनांमंदिरांत प्रार्थनेला कधींहि जात नसे. रेक्टर या नात्याने त्याला कॉलेजांतील विद्यार्थ्यांना मदिरांत न्यावे लागे, त्या वेळी तो मंदिराच्या दारापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जाई व स्वतः तेथूनच परत जाई. त्याच्या मताप्रमाणे मनुष्याची सर्व वागणूक हीच मुळी प्रार्थना होय. मनुष्याने सर्व व्यवहारांत आपले कर्तव्य बजावले, म्हणजे ईश्वराची खरी भाक्ति झाली, असे तो समजत असे.

 कॅटच्या असल्या धर्ममतांबद्दल व ती मते एका ग्रंथांत प्रतिपादन

९२