पान:तिच्या डायरीची पाने.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती. आम्हाला तडजोडीत स्वारस्य नव्हतेच.. भूमिका म्हणून तसे करणे कितपत योग्य होईल याचा आम्हालाही अंदाज येत नव्हता. कारण "दिलासाघर" सुरू होऊन जेमतेम तीन वर्षे होत होती. आम्हीही शिकतच होतो. पण निर्णय निर्मलाने घ्यावा, तोही आमचा विचार न करता, हे आम्ही तिला पटवले होते. तिला हवे असलेले शांत व सुरक्षित जीवन तडजोडीतून मिळणार असेल तर, ती करावी अशी भूमिका आम्ही घेतली होती. वडिलांच्या हट्टापायी हातचे सारेच गेले. "घी गया और गडवा भी गया."
 नंतर मात्र निर्मला अधिक सैरभैर झाली. तिचे मन अंबाजोगाईत गुंतेना. औरंगाबादला दाई ट्रेनिंगसाठी खाजगी व्यवसाय उत्तम रितीने करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे ठेवले. पण त्यातही तिचे मन रमले नाही. कोणत्याही परिस्थितीत वडिलांच्या गावी स्थिर व्हायचे नाही, राहायचे नाही हे मनात पक्के ठरवले. चुलतभाऊ हडपसरला राहात होता. बाबूही वर्षभरापूर्वी हडपसरला गेला होता. त्याच्याकडून भावाचा पत्ता शोधून काढला. मसाले आणि खाद्यपदार्थ करणाऱ्या कंपनीत पॅकिंग विभागात रोजगारही मिळणार होता. हे सारे संस्थेतील महिलांना सांगण्याचे धाडस निर्मलात निर्माण झाले नाही. खरे तर तिला बाहेरच्या जगाची ओळख व्हावी म्हणून आम्ही शिबिरांना पाठवले होते. संस्थेच्या हितसंबंधी ताईबरोबर त्यांच्या मुलींच्या लग्नानिमित्त मुंबईतही पंधरा दिवस राहून आली होती. त्यामुळे एकूण परिरस्थतीच्या संदर्भात स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची ताकद तिच्यात आली होती. परंतु तरीही स्त्रीच्या मनाभोवती काही कुंपणे असतातच. ती ओलांडणे शक्य होत नाही.

 परित्यक्ता स्त्रियांनी काही काळ स्त्री-पुरुष समागमाचा अनुभव घेतलेला असतो. त्यातील सुख वा समाधान यांची शरीराला सवय झालेली असते. अशावेळी त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याशी सतत संवाद साधणे महत्त्वाचे असते. निर्मलाने बाबूशी विवाह करणे यात गैर काहीच नव्हते. किंबहुना तो अधिक सुखाचा आणि सुरक्षित मार्ग आहे. पती पत्नीच्या वयाचा प्रश्न, त्यांच्यात व्यवस्थित संवाद असेल तर उद्भवत नाही. मम्मी ऊर्फ गंगामावशीही तिच्या निर्णयाकडे आता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागल्या आहेत. पुढच्यावेळी निर्मला इकडे आली की दिलासात चार दिवस माहेरपणाला येईल. मीही तिच्याशी

निर्मला
७७