पान:तिच्या डायरीची पाने.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तुम्ही नकार दिलात तर एवढीच रक्कम खर्चून न्याय आमच्याकडे खेचून आणू. मानले नाही तर 'हे गेले नि ते गेले' असे म्हणत हात हलवीत बसावे लागेल. शंभरदा विचार करा. असे सांगून ते निघून गेले. जाताना मला विशेष करून बजावले ते असे-
 "ताई, प्रकरण कढईत असते तेव्हा खमंग वास, दहादिशांना पसरलेला असतो. मग मोठे मोठे मोर्चे निघतात. निषेधाची पत्रके पावसागत कोसळतात. पण आता सारी राळ जमिनीवर स्थिर होऊन बसली आहे. निर्मला मातोळे कोण हेही लोक विसरले आहेत. अशी प्रकरणे फार तर वर्षभर तेजीत असतात. हेही ध्यानात ठेवा."
 आम्ही निर्मलाशी चर्चा केली. निर्मला या प्रकरणाला एवढी वैतागलेली होती की, तीस चाळीस हजार रुपये घ्यावे नि प्रकरण कायमचे मिटवून टाकावे असे तिला वाटत होते. आम्हीही तिची बाजू, तिचे मन समजू शकत होतो. वडिलांचा विचार घ्यावा अशी तिची इच्छा असल्याने मातोळे पाटलांना निरोप धाडला. ते आले. त्यांचे म्हणणे असे की लेकीचे एवढे नुकसान केले नि तीस हजारावर बोळवण करतात? किमान दीड लाख रुपये पोरीला मिळायला हवेत.

 ही केस शासनामार्फत होती. आम्ही आमचा वकील देऊ शकत नव्हतो. त्यासाठी करावी लागणारी कार्यवाही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ होती. तिला नैतिक धाडस देण्यापलीकडे आमच्या हाती काहीच नव्हते. मात्र अंबाजोगाईच्या कोर्टातून पोटगीचा दावा चालू केला होता. निर्मला त्या सहा महिन्यांच्या बंदिवासात इतकी जायबंदी झाली होती की, थंडीत गुडघे नि कोपरं दुखत. डोळे अधू झाले होते. त्यामुळेच तिला मनोमन वाटे की तो पैसा बँकेत ठेवावा. येणारे व्याज नि थोडे काम करून येणारे पैसे यांत गुजराण होईल. वडील मात्र शेवटचा आकडा लाखाचा बोलून तिथेच हटून बसले. व्हायचे तेच झाले. पुराव्याअभावी सुधाकर, त्याचे वडील निर्दोष सुटले. प्रत्येक प्रमुख वर्तमानपत्रांतून ती बातमी ठळक अक्षरात छापून आली. अत्याचार करणाऱ्यांच्या कठोर हातातली अन्याय करण्याची ताकद आणखीन वाढली. स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी सतत झगडणाऱ्या कार्यकर्त्या, संघटना व्यथित झाल्या. निर्मला मात्र वडिलांपासून तुटली. तिने वडिलांना लाखाचा हट्ट सोडण्याची विनंती केली

७६
तिच्या डायरीची पाने