पान:तिच्या डायरीची पाने.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खचल्या आहेत अशा स्त्रिया न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या की खूप एकाकी होतात. त्यांच्यातील सारे धैर्य अक्षरशः गळून जाते. आमची कार्यकर्ती दरवेळी निर्मलावरोवर लातूरच्या जिल्हा न्यायालयात जात असे. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आले. विरुद्व पक्षाचा वकील तारीखवारांवर विशेष भर देऊन गोंधळात टाकतो, त्यामुळे घराबाहेरच्या जगाशी अजिबात ओळख नसलेली, अक्षर ओळख नावालाच असलेली बाई भांबावते. वकिलांनी घोटवलेली वाक्ये विसरून जातात. घडलेल्या गोष्टी आठवेनाशा होतात. शब्दच उमटत नाहीत. निर्मलाचेही असेच झाले.
 एक दिवस रात्री दारासमोर रिक्षाचा आवाज आला. पाहुणे अगदीच नवे दिसत होते. पायाने लंगडणारे. डोळ्याला चष्मा. "येऊ का आत?" असे अत्यंत अदबशीरपणे विचारून घरात आले. ते होते आरोपीचे (निर्मलाच्या सासरच्या मंडळींचे) वकील. त्यांना आमच्याशी अत्यंत महत्त्वाचे खाजगीत बोलायचे होते. म्हणून ते लातूरहून रिक्षा घेऊन आले होते. मी तात्काळ आमच्या वकिलांना संस्थेत येण्यासाठी निरोप दिला आणि त्या वकिलांना घेऊन संस्थेत गेले. त्या वकिलांचे नांव आपण काहीही धरूया.
 "भाभी, मी तुम्हाला नि डॉक्टरना ओळखतो. तुमच्या संस्थेबद्दल ऐकून आहे. मला तुमच्या कामामागची भूमिका कळते. निर्मलावर अन्याय झाला आहे. हे मी पण जाणतो. पण मी वकील आहे. कायद्यातले छक्केपंजे मला कळतात. तुम्हाला वाटत असेल की राज्य कायद्याचे आहे. पण राज्य माणसाचे आहे आणि माणसे 'मॅनेज' करता येतात. त्यांना विविध प्रकारे फितवता येते. न्याय खेचून कसा आणायचा आणि दोषी माणसांना न्यायालयातून निर्दाष कसे शाबीत करायचे याच्या खुव्या माझ्या इतक्या कोणीच जाणीत नाहीत. माझी ओळख लातूरच्या जाणकार वकिलाला विचारून घ्या.
 पण तरीही तुमच्याबद्दलचा आदर आणि निर्मलाची निष्पाप मूर्ती मला इथवर घेऊन आली. आम्ही समझोता करण्यास तयार आहोत. पंधरा हजार रुपये रोख, तिच्या माहेरून आलेली भांडीकुंडी आणि गळ्यातील मंगळसूत्राचे मणी, जे.अर्धातोळा भरतील आणि घरातील एक खोली किंवा त्याचे पैसे पंधरा हजार रुपये रोख देण्यास तयार आहोत. विचार करा आणि दोन दिवसात कळवा.

निर्मला
७५