पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यामध्ये एक महिला पोलिसही होती. तिने निर्मलाची चौकशी केल्यावर, सासूने सांगितले की निर्मला घरातून पळून गेली आहे व ते पेपरमध्येसुद्धा दिले आहे. तो पेपर तिने आणून दाखविला. ती पेपर आणावयास गेली यावेळी तिच्या मागोमाग स्त्री पोलिसही आंत गेली. निर्मलेला शोधले. निर्मला सापडली नाही. गच्चीवर अडगळीची खोली आहे असे सांगून त्या खोलीत नेण्याचे सासूने टाळले. परंतु गच्चीवरच्या खोलीत अखेर ती त्यांना दिसली. निर्मलाला खोली बाहेर काढले. त्यानंतर अंबाजोगाईला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार करून तिला माहेरी, सुरक्षित ठिकाणी पाठवले. सुरुवातीस अनेक लोक येऊन भेटत. सहानुभूती व्यक्त करीत. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे एकाकीपण वाढू लागले. दरवेळी प्रत्येकाला तीच ती गोष्ट खुलवून सांगण्याचा कंटाळा येऊ लागला. नि मग मनात येई, पुढचे आयुष्य कसे जाणार? तिची एक मोठी चुलत बहीण शकू, गावातच दिलेली होती. एका मुलीला जन्म दिला. पंचमीच्या निमित्ताने माहेरी आली ती परत गेलीच नाही. नवऱ्याला बाहेरचा नाद होता. दारूसाठी शेत विकीत राहाणे एवढाच त्याचा उद्योग. तिच्याशी निर्मला मन मोकळं करीत असे. भावाच्या दारात धुणीभांडी घाशीत नि शेतात मरेस्तो कष्ट करीत बसण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहाणे सर्वात सोयीचे. असे शकू नेहमी सांगे. निमूने येत्या २/३ वर्षात पायावर उभे राहावे असे ती म्हणे. एकदा का या भट्टीत आपण शिरलो की पुन्हा सुटका नसते. तिनेच मनस्विनी महिला प्रकल्पाची माहिती निमूला दिली. आपली दुःखी लेक संस्थेत जाणार म्हटल्यावर मातोळे पाटील रागावले. परंतु निर्मलेच्या हट्टापुढे त्यांना हार खावी लागली. आणि निर्मला मनस्विनीत दाखल झाली.

 सरकारच्या (शासनाच्या) वतीने तिचे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. अत्यंत धाडसी आणि कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिकाऱ्याच्या पुढाकाराने प्रकरण न्यायालयात गेले असल्याने, तिच्या मनात आपल्याला नक्की न्याय मिळेल याबद्दल खात्री होती. आम्हीही या प्रकरणी सतत शासकीय वकिलांशी - पी. पी. शी संपर्क साधीत होतो. पण प्रकरण न्यायाधीशांसमोर येत नव्हते. दरम्यान पोलिस अधिकाऱ्याची बदली झाली. आम्ही एकूण अंदाज घेत होतो. वकिलांच्या शब्दातही 'जरतारी' भाषा येऊ लागली होती. अर्धवट शिकलेल्या, त्रासाने

७४
तिच्या डायरीची पाने