पान:तिच्या डायरीची पाने.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंबहुना सतत त्या आधाराची किंमत मागते. मग ते घर वडिलांचे असो. वा नवऱ्याचे - सासऱ्याचे असो. म्हणून तर दिलासा घराची वा परदेशातील 'Home for Battered women' ची गरज भासाते. काहीवेळा अशा प्रश्नांची चर्चा करू लागलो की समाजातील समंजस (?) चेहरा असणारे म्हणतात "असो, या तर जुन्या गोष्टी.......!" हे खरं नाही हे आपल्याला शैलाताईच्या अनुभवातून लक्षात येईल. पाच वर्षापूर्वी निघालेल्या परित्यक्तांच्या मोर्चातील सगळ्यात धाकटी सात वर्षाची होती आणि औरंगाबादला आयोजित केलेल्या परित्यक्ता परिषदेला इतकी गर्दी झाली की व्यवस्था कोलमडून पडली हे वास्तव आहे.
 या साऱ्या कहाण्यांच्या मुळाशी काय आहे याचा विचार केला तर लक्षात येईल की दारिद्र्य, अंधश्रद्धा, जातीयता यांचा हा गुंता आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी किमान आर्थिक सांस्कृतिक सामुग्री नाही. मात्र जातीयता - अंधश्रद्वा यांनी दिलेले सांस्कृतिक अहंकार आहेत. गळ्याला आवळलेला दैववादाचा फास आहे! कोणत्याही नाडलेल्या वर्गाचा आपण विचार करतो तेव्हा त्यातील प्रत्येक व्यक्ती गुणवान आहे, बिनचूक आहे असा आपला दावा नसतोच मुळी. पण प्रश्न विचारणारे अनेक विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात त्यांना 'तसल्याच' गटात ढकलण्याचा प्रयत्न करतात. या लेखसंग्रहात शैलाताईंनी या मुलींवर होणाऱ्या अन्यायांची नोंद जशी केली आहे तशीच त्यांच्या तरूण मनादेहाच्या हेलकाव्यांची सुजाण दखल घेतली आहे.

 अभावग्रस्त घरातील तारूण्य ही अत्यंत केविलवाणी वस्तुस्थिती आहे. घरातले कळंजलेले वातावरण, आजार, दारिद्र्याने गांजलेल्या वडिलधाऱ्यांचे एकमेकातले ताणतणाव या वातावरणात देहाच्या तारुण्याच्या जाणिवेने फुलणारे मन घराबाहेर वाट शोधू पहाते. व्यक्तिमत्त्व फुलविण्याचे शिक्षणासारखे वा कलेसारखे कोणतेच सांस्कृतिक मार्ग खुले नसतात, तेव्हा आपोआप पुरूषस्पर्श हीच आपल्या अस्तित्वाची एकमेव दाद मानणाऱ्या या मुली भरकटत जातात. त्यांच्या आयुष्यातील किमान अपेक्षांची फार मोठी किंमत त्यांना द्यावी लागते. या कहाण्या एकेका मुली-बाईच्या असल्या तरी या लेखसंग्रहात नकळत एक समाजपट उलगडत जातो. कामापाठोपाठ फिरणारा समाज, मध्यमवर्गीय वस्तीच्या कडेकडेला राहून रोजगार करणारा समाज, अज्ञानापोटी अंधश्रद्धेने गांजलेला समाज यामध्ये