पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आरडा-ओरडा करील व आपले बिंग बाहेर फुटेल या भीतीने तिच्या सासऱ्याने तिचे कपडे विझवले. नणंद, सासू, सासरे यांच्या जाचाने तिचे मानसिक बळ कमकुवत झाले होते. सासरा बुटाच्या लाथा मारीत असे. सासू तिला तुडवीत असे. अंधाऱ्या खोलीत एकाच जागी तिला बसून राहावे लागत असे. आडवे होऊन झोपायचे नाही, झोपली तर सासू तिचे गुडघे, हाताचे कोपरे, लोखंडी बत्याने सडकून काढीत असे. दररोज तिला रात्रीच्या सुमारास खोली उघडून अर्धी भाकरी नि एक वाटी पाणी तेवढे मिळत असे. त्यावरच ६ महिने ती गुजराण करीत होती. विवाह प्रसंगी निर्मला फार छान दिसत होती. गुडघ्यावर तोंड टेकवून बसल्यामुळे तिच्या गालाला जखमा झाल्या होत्या. एकाच जागी बसून मांड्यांना जखमा आल्या होत्या. बसलेल्या जागेभोवती साखरेचे रिंगण केल्यामुळे मुंग्या येऊन तिला चावीत असत. एवढा जाच सहन करूनही जर का ती झोपली तर तिला बुटांच्या लाथा खाव्या लागत. खोलीच्या बाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे नैसर्गिक विधी तिला खोलीतच उरकावे लागत. सहा महिन्यात निर्मलाला तोंड धुवायला मिळाले नाही की आंघोळीला पाणी सुद्धा मिळाले नाही. सहा महिने ती एकवस्त्रा होती. कित्येकदा सासूने डोळ्यात तिखट टाकून मारले. ती कोठडीत असताना तिचा भाऊ व वडील तिच्या भेटीसाठी आले होते. परंतु ती घरात नाही परगावी गेली वगैरे खोटी कारणे सांगून त्यांना पिटाळून लावले होते. तू जर ओरडलीस तर तुझ्या भावाला मारून टाकू अशी धमकी तिला दिली होती. मांडवा गाव एक खेडे. तिथे पेपर कुठला येणार? त्यामुळे बालाजीला गेलेली निर्मला हरवली असल्याचे सासऱ्यांनी दिले होते, ते त्यांच्या वाचण्यात आले नाही. त्यांना वाटे की निर्मला मजेत आहे.

 एके दिवशी तिच्या नणंदेची मैत्रीण घरी आली. तिला घेऊन नणंद गच्चीवर गेली असताना मैत्रिणीने सहज खिडकी उघडली तर आत निर्मला. मैत्रिणीने पाहिले आता ती सांगेल म्हणून तिच्या नणंदेने तिला १०० रु. देऊ केले. मैत्रिणीने धाकास्तव पैसे घेतले व कोणाला सांगणार नाही असे म्हटले. परंतु घरी जाऊन तिने सर्व हकीकत आई-वडिलांना सांगितली. मैत्रिणीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सर्व हकीगत पत्राने कळविली.
 एक दिवस सकाळी ६ वाजता पोलिसांची जीप दारात येऊन उभी राहिली.

निर्मला
७३