पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मांसही झडून गेले. डोळे खोल गेले.
 निर्मलाला मारून टाकून विल्हेवाट लावण्यापूर्वी खुनाच्या आरोपात अडकू नये याचीही खबरदारी घेतली होती. स्थानिक वर्तमानपत्रात निवेदन दिले की, आमची तरुण सून बालाजी यात्रेला गेली असताना तिथे हरवली. ती सापडली नाही. कोणाला सापडली तर त्याने कळवावे. इनाम मिळेल वगैरे.... माणसाच्या शरीरातील आणि मनातील जीवेच्छा इतक्या बळकट असतात की प्रतिकूल वातावरणातही माणूस जीव जगवत राहातो. जपत राहातो. निमूही जगत होती. मरावेसे वाटले तरी जगत होती.
 एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि न्याय मिळवून देणारा अधिकारी त्या जिल्ह्यात काम करीत होते. त्यातूनही एका तरुण अधिकाऱ्याच्या कारकीर्दीची सुरुवात असल्याने एक विलक्षण धडाडी त्याच्या कार्यपद्धतीत होती. जिल्ह्याच्या बाहेरही त्यांच्या नावाचा बोलबाला होता. या बाबीचा फायदा निमूला नकळत मिळाला. आता या प्रकरणाबाबत अभ्यास करीत असताना आमच्या लक्षात आले की निमूच्या सुटकेच्या मुद्यावर काही 'रंजक कथा' रचल्या गेल्या. अर्थात या कथांमुळे मूळ प्रकरणाला बाधा येत नाही. एक कथा अशी.
 एक दिवस वरच्या व्हेंटिलेटरमधून, खिडकीतून एक चेंडू खोलीत टपकला. दुपारची वेळ असल्याने सासू झोपली होती. एरवी मुलांनी माडीवर येऊन वरच्या खिडकीतून डोकावण्याचे धाडस केले नसते. एक पोरगं गुपचूप वर आलं. बंद खिडकीचा आधार घेऊन व्हेटिलेटरमधून चेंडू पाहण्यासाठी आत डोकावलं. आतील भेसूर निमूवहिनीचा अवतार पाहून निमूवहिनीचे जिवंत भूत वरच्या खोलीत राहाते. ते चालते. त्या भुताने त्यास बोलावले. असे मुलाने सांगितले. तो मुलगा घाबरून आजारीही पडला. त्याच्या आईवडिलांनी पोलिसात कळवले. आणि मग निमूची सुटका झाली इत्यादी.

 निर्मलाने सांगितले ते सत्य असे- तिला खोलीत भयानक मारहाण केली जाई. सासूसासरे तिने ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात बोळे कोंवीत व मारीत असत. तिचा सासरा हा सर्व प्रकार पाहात उभा असे. आमच्या मुलाची नोकरी तू घालवलीस. हिची बोटे तोडा, मान तोडा अशी धमकी देत असे. एकदा सासूने तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला व तिला पेटविले देखील. पण ती

७२
तिच्या डायरीची पाने