पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आमच्या दिलासाघरात आल्यापासून जीभ मात्र चांगली लवलवायला लागली होती. ओव्या छान म्हणत असे. माहेर संमेलनात धावण्यात पहिला नंबर पटकावला होता. पण दर दोनचार दिवसांनी झटका येई. मग आरडाओरडा कर, तर कुणाशी वचावचा भांडे.' लहान लेकरांना - तेही दुसऱ्या बायांच्याच, भरपूर बदडून काढी. अद्वातद्वा शिव्या देई. असले चाळे चालत. शिवणासाठी तर जात नसेच. एका सकाळी दिलासाघरातून ती नाहीशी झाली. आम्ही पोलिसात कळवले. शोधाशोध केली पण तपास लागला नाही.
 दिवस जात होते. पण कधी कधी दैवाची आठवण येई नि मन खारे होई. आपण या पोरीच्या मनाला दिलासा देऊ शकलो नाही. तिची समजूत घालू शकलो नाही याची खंत मनाला बोचत राही. नवऱ्याने तर दुसरे लग्न केले होते. बापाने गाव सोडून मुंबईचा रस्ता धरला होता.
 एक दिवस संस्थेतला ड्रायव्हर सांगत आला, "ताई, परवा दैवा दिसली होती. पंजाबी डरेस होता अंगावर. मांजरसुंभ्याजवळच्या हॉटेलात चहा प्यायला थांबलो तर, आत ही. आम्हाला पाहून जी आत गेली ती बाहेरच आली नाही. ती कारखान्यावरची बाई, मागं पोलिसांनी हाकलली नव्हती का? तिनंच मांजरसुंब्यात ढाबा खोलला आहे. दैवाबी तिथंच राहते जनू!... जाऊ द्या. ज्याचं नशीब त्याच्या बरूबर.” असं म्हणत ड्रायव्हरने उसासा टाकला नि तो कामाला लागला.

 दैवाला मानसोपचार तज्ज्ञाला दाखविण्याचे आम्ही ठरवले होते. एका प्रकरणाच्या बाबतीत आम्ही त्या मुलीच्या पालकांना नांदेडच्या मानसोपचारतज्ञांकडे पाठवले होते आणि त्यांच्या उपचारांचा योग्य परिणामही झाला. ती मुलगी परत नवऱ्याकडे नांदण्यास गेली नाही. तशी अपेक्षा नव्हती. पण तिने स्वतःच्या चिमुकल्या मुलीवर राग काढू नये, तिला सतत मारू नये आणि स्वतः काही उद्योग करावा ही पालकांची इच्छा होती. दोन वर्षाची असताना संस्थेत दाखल झालेली ती छबकडी आता पाचवीत शिकते आहे. तिची आई छोटेसे दुकान चालवते. भावाच्या व आईच्या मदतीने स्वतंत्रपणे प्रपंच चालवते. दैवाने आम्हाला संधीच दिली नाही. जर तिलाही अशा तऱ्हेचे उपचार मिळाले असते तर कदाचित ती अशा तऱ्हेच्या व्यवसायात अडकली नसती. पण असेही मनात येते की स्त्रियांनाही शारीरिक स्तरावरील इच्छा आकांक्षा असतात. तरुण वयात त्या बळावतात.

५४
तिच्या डायरीची पाने