पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आला. तिच्या बरोबर ती शेजारच्या झोपडीत शिरली. आतला थाट वेगळाच होता. मोठ्ठा पलंग जवळ रंगीत टी.व्ही. स्वैपाक घरातली भांडी चकचकीत. दोन तरुण पोरी वेणीफणी करीत होत्या. दैवा सगळीकडे नजर टाकीत पोटभर जेवली. रात्री जाग आली तेव्हा ती बाई कुणाला तरी दबल्या आवाजात सांगत होती, "पोरगी जानजवान हाय. गोरी बी हाय. महिना पंधरा दीस खुराक दिला की दहाजणीत उठून दिसंल. मग बगा एकांदा टरकवाला. भोवनी झाली की तिकडंच टाक म्हणावं लाइनीला. मला मातुर दोन हजार नेक पायजेत..."
 दैवाचं मन ऐकता ऐकता थिजून गेलं. पहाटे उठून डबा हातात घेऊन संडासला म्हणून गेली. ती झाडाझुडपातून लपत छपत सकाळला डांबरी रस्त्याला लागली. हा रस्ता ओळखीचा होता. तालुक्याला जाणारा. उन्हं डोक्यावर आली तेव्हा ती कोर्टाच्या दारात उभी होती.
 तिने ऐकले होते की कोर्टात गेले की बायांना मदत करतात. पण इथे तर नुसती गर्दी. काळे कोट घातलेल्या माणसांची, बायाबापड्यांची नि पुरुषांची. दुपार टळून गेली. संध्याकाळ झाली. कोर्ट बंद झाले. दैवा समोरच्या धरमशाळेच्या पुढ्यात पदर तोंडावर घेऊन पडून राहिली. दुसऱ्या दिवशी नळावर तोंड धुतले. गटागटा पाणी प्याली. आणि परत कोर्टाच्या आवारापुढे थांबली. काल ज्यांनी तिला पाहिले होते त्यांना वेगळीच शंका आली असावी. ते नाव विचारायचे. गुपचूप नोट दिसेल अशी दाखवायचे. पण एक माणूस बरा भेटला आणि ती आमच्या संस्थेत दिलासाघरात आली.
 ....दैवानं चहा पिऊन टाकला. मान खाली घालून म्हणाली, "ताई माझं चुकलं. एवढ्यावर माफी दया. उद्यापासून मी शिवणक्लासला जाईन. समदं करीन."

 पण दैवाचं मन संस्थेच्या शिस्तीत रमलं नाही. तिला पाटी पेन्सील नकोशी वाटे. सकाळची प्रार्थना तर मुळीच आवडत नसे. "कशाला वो परार्थना? काय देतो. देव? आन आसतो तरी का? असेल माजा हरी नि देईल खाटल्यावरी असं खेड्यातली मानसं म्हनतात. त्यांचा जीव 'हरी हरी' जपण्यात चाललाय. पण हरी देतो का सुख? देतो आयती भाकर? कळतं तवापासून मी देवाला दंडवत घालते. काय दिलं त्याने मला? घर की भाकर?" ती विचारी.

दैवशीला
५३