पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पैशे आले की गाडी घेऊ नि मग पोरीला आणू." सासऱ्यांनी माहेरात नेऊन घातले. चापाणी झाले. निघताना दैवाच्या वडिलांचा हात धरून विनवले, "इवाईबुवा तुमची लेक तुमच्या दारात आणून घातली. तिचं काय करायचं ते तुमीच बगा. आताच तालुक्याच्या गावाला काडीमोड घेऊन आलो. तुमची पोर गेलं सालभर येड्यासारखी वागती. बायको असून नसल्यासारखी. माझा पुतन्या तरूण हाय धट्टाकट्टा हाय. त्याला बी संवसार कगयची हौस हाय. पन तुमची पोर दगड घेऊन हिंडती. कामाला हात लावीत नाही. हसती तर हसतीच नि रडती तर रडतीच. तवा मान मोकळी करून घेतली आमी. सायबासमूर सही घेतलीया....."
 चुलत सासरा तरातरा निघून गेला. वडील डोक्यावर आभाळातून दगड कोसळावा तसे बघत व्हायले. शुद्ध गेल्यासारखे. आई दाराआडून ऐकत होती. ती भिंतीवर डोकं फोडून घ्यायला लागली. रडायला लागली. थोड्या वेळात गाव जमा झालं. बायाबापड्या, माणसं, लेकरं. दैवा मात्र दगडासारखी निमूट बसून होती. डोळ्यातले पाणी मात्र आटून गेलेले. आता कसे व्हणार ते? बाया आईला म्हणत, पोरीला बाधा झाली. कुणालातरी दाखवा. पण त्यालाही पैसा लागतो. वडील आणि आईचे बोलणे चाले. ही लेक अशी माघारी आली. त्यातून वेड्यागत वागते म्हणून सासऱ्याने आणून घातले गे. धाकट्यांची लग्नं कशी जमायची? हाच घोर त्यांना जाची. दैवाला सार कळे. पण बंद ओठ एवढे कुलूपबंद झाले होते की मनात आले तरी ते उघडत नसत. मनातल्या मनातच काय ते बोलायचे. शेवटी एका रात्री मनात वेगळाच विचार आला. पहाटे डबडे घेऊन पांदीकडे गेली ती माघारी परतलीच नाही. साखर कारखान्याजवळ येईस्तो उन्हं चांगली भाजायला लागली होती. पाय जडावून गेलेले. पोटात भूक. एका झाडाखाली बसली. थकलेल्या जिवाला कधी झोप लागली ते कळलेच नाही. कुणीतरी हलवून उठवीत होते. डोळे उघडले तर एक बाई हाताला धरून हलवीत होती. आणि विचारीत होती, "ए पोरी, कुनाची हाईस? कुठं निगालीस? पळून चाललीस जनू? जिकडे तिकडे लायटी चमकायला लागलेल्या. अंधार चोहोबाजूंनी भरून आलेला. उरात भीतीचा पूर भरून आला. त्या बाईच्या हाताचा आधार खूप हवासा वाटला.

 "चल माय माज्या संग. जेऊन घे." बाईचा मऊ आवाज. दैवाला धीर

५२
तिच्या डायरीची पाने