पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बोलणे, हसणे पार संपले होते. सासरी आली तरी कुणाशी बोलत नसे. मनात आले तर कामाला हात लावणार. एरवी झोपून राहाणार. नवरा मनातून घाबरला होता. त्याला भय वाटे की हिने जिल्हयाच्या पोलिस ठाण्यात तक्रार केली तर काही खरे नाही. त्या परिस आहे तशी सांभाळावी. पण दैवाने नवऱ्याशी बोलणे साफ तोडले. असे एक वर्ष गेले. एक दिवस हनुमान सुरेखशी साडी, बांगड्या घेऊन आला. येताना मिठाई आणली. बायकोला साडी दिली. दैवाच्या ओठावर फिकी रेषा चमकून गेली. रात्री हात धरून खोलीत नेले. जवळ घेऊन सांगितले, "दैवा, आपलं नशीब उघडलं. मला बँकेतलं कर्ज मिळतेय. लोन म्हनतात त्याला. बायांच्या नावानं लोन मिळतय. तुज्या नि माज्या दोघांच्या नावावर कर्ज उचलायचंय. आपण नवी गाडी घेऊया. आता दारू फिरू समदी सोडनाराय मी. तुला डागदराकडे नेऊन औषधपाणी करीन. म्होरल्यासाली पाळणा हललाच पाहिजे . बघ घरी...."
 दैवाला वाटले, जणु आजच लग्न झालंय. गोड गोड बोलणे, गोड गोड लाड. दुसऱ्या दिवशी चुलत सासरा, सीताराम काका, हनुमान, त्याचे दोन मित्र नि दैवा तालुक्याला आले. कोणत्याशा हापिसात गेले. तिथला थाट, सुटाबुटातली माणसे पाहून दैवाची जीभ पार चिटकून बसली. कोट घातलेल्या सायबानं विचारलं, "बाई तुला या कागदावर लिहिलेलं वाचून दाखवलं का?" दैवाची मान खालीच. "व्हय म्याच दाखवलं. मी मानलेला भाऊ हाय बाईचा” हनुमंताचा मित्र बोलला.
 "बाई तुमची तक्रार नाही का?" साहेब.
 "...........” दैवा.
 "अं. करा इथं सही.” साहेब.

 सही बरीक करता येई. तेवढीच काय ती अक्षर ओळख. समोर कागद, नोटेच्या कागदासारखा करकरीत. वर निळ्या रंगाच्या गिचमिट रेघोट्याच की! कारण काय अक्षरं लिहिली आहेत, हे कुणाला कळत होतं? रांगोळी काढावी तशी सही करता यायची ऐवढेच! पण आज सहीची रांगोळीपण आठवेना. शेवटी साहेब म्हणाले अंगठा लावा बाईचा. दैवाने अंगठा उठवला. सगळे बाहेर आले. चुलत सासरे म्हणाले, "हनुमंता, चार दिवस माहेरी नेऊन घालतो पोरीला.

दैवशीला
५१