पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सवय वाढली. एक दिवस दारूच्या नशेत, गाडी रस्ता सोडून पलटली. बरे तर बरे तो वाचला. पण मालाची राखरांगोळी झाली. मालकाने दोन महिन्यांचा अगाऊ पगार हातात कोंबून कामावरून कमी केले. हातात पैसा येईना. दारू नि मटनाची सवय तुटेना. मग घरात त्रागा. "लगीन होऊन चार वर्षे झाली तरी लेकरू, बाळ होत नाही म्हनून माझं लेकरू दुखी झालंया. वंशाला दिवा लागला की समद्या कामात हुरूप येतोया. हिच्यामुळंच माझं पोरगं दारूच्या नादी लागलं. हिचा पायगून बरा न्हाई. हिला वापाकडं धाडावं नि नवी सून घरात आणावी...." असा सासूचा नवा ठेका सुरू झाला.
 सवतीच्या नुसत्या कल्पनेने दैवाचा जीव चोळामोळा होऊन जात असे. एका दिवसाची हकीगत. संध्याकाळची वेळ. दैवा घरात एकटीच. घर कसले? लहानशी झोपडीच. झोपडपट्टीतली. थंडीचे दिवस. सूर्य लवकर बुडतीला लागे. हनुमंताला... तिच्या नवऱ्याला परळी-गंगाखेड टेम्पोवर नोकरी लागली होती. पण घरी यायला चांगलीच रात्र होई. बाहेर खाऊन पिऊन आडवतायला घरी येत असे. तर त्या संध्याकाळी बंगल्यातल्या सायबिणीनं दिलेला शिळा भाकरतुकडा खाऊन दैवा आडवारली. कधी डोळा लागला कळलं नाही. अचानक जाग आली तर कोणीतरी झोपडीचं कवाड लावून घेतय. नवऱ्याचा मित्र दारू ढोसून घरात आला होता. दैवा किंचाळली. चपल्या मारून त्याला बाहेर काढले. नेमका त्याचवेळी नवरा का येऊ नये तिथे. तोही दारूत बुडून आलेला. त्याने बायकोचा हात खेचला. फरफटत टेम्पोत कोंवलं. आणि टेम्पो सुरू केला. दैवा ओरडतेय. हनुमंत गाडी चालवतोय नि एका हातानी तिला मारतोय. टेम्पो चढावाला लागला. गाडीचा दरवाजा खट्कन उघडला नि दैवा खाली ढकलली गेली. समोरून गाडीचे दिवे लखकन चमकले आणि हनुमंत खाडकन ठिकाणावर आला. कर्रकन ब्रेक दाबून गाडी खडी केली..... उभी केली. आणि अस्ताव्यस्त दैवाला हात लावून पाहिला. जीव जागेवर होता. पण डोक्यातून रक्ताची धार लागली होती. गाडीत घालून थेट अंबाजोगाईला दवाखाना गाठला. माळवदावरून बायको पडली असे सांगून तिच्यावर उपचार केले. दैवा आठ दिवसात बरी झाली. पण तेव्हापासून तिची नजर वदलली. कोरडी विहीर असावी तशी नजर. खोल, भेदणारी… पण निर्विकार. बापाने चार दिवस घरी नेले. पण तिचे

५०
तिच्या डायरीची पाने