पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नवऱ्याच्या गोडीनं, सासू सासऱ्यानं धाडलं तरच यायचं. आम्ही पन जमल तशी चोळी बांगडी करू. शिदोरी देऊन वाट लावू. पन जर का या पुढं पळून आलीस तर पाय तोडून नवऱ्याच्या अंगणात नेऊन घालीन. तुझी तिरडी नवऱ्याच्या घरूनच निघल. त्या गावची शीव वलांडलीस तर याद राख...."
 तेव्हापासून माहेरची आशा तुटली. नवऱ्याला परळीत चांगली नोकरी मिळाली. मुंबई-पुण्याला जाणाऱ्या मालट्रकवर ड्रायव्हर म्हणून आठशे रुपये मिळत. शिवाय वरची कमाई वेगळीच. लग्नाला दीड वर्ष झालं होतं. दैवाही घरात रुळायला लागली होती. घरातले काम, शेतातले काम करण्यात हुशार झाली होती. आठचार दिवसाला नवरा परळीहून मुक्कामाला येई. येताना चिटाचे कापड वर कधी बांगड्या आणि पावडरचा डबा नि भिवया रंगवायची काळी पेन्सिल गुपचुप हातात देई. त्याला वाटे की, तो आल्यावर हिने पावडर लावावी. थोडे नीट नेटके राहावे. पण पंधरा वर्षाच्या दैवाला नेमके कसे वागावे कळत नसे. पावडरीचा वास सासूच्या नाकापर्यंत जाईल यानेच ती
धास्तावत असे.
 हनुमंताने नवीन चाल चालवली. पोटाचे हाल होतात या निमित्ताने परळीत घर करायचे ठरविले. आणि दैवाची रवानगी परळीत झाली. चार दिवस सासू राहिली. संसाराची मांडामांड करून ती माघारी परतली. नवा गाव, नवा संसार, नव्या ओळखी. गाव बरं होतं. दर सोमवारी वैजनाथाचे दर्शन घडायचे. पण काही नव्या गाष्टीही तिच्या ध्यानात आल्या. हनुमान दोन दोन दिवस पुण्या-मुंबईच्या 'लायनी'वर असायचा. घरी आला की धुमाकूळ सुरू. बाटली नि तो. एकमेकांच्या सहवासात. मध्येच जाऊन मटन आणून टाकी. दैवाने मालमसाला घालून मटनरस्सा शिजवायचा. भरपूर पिणे झाले की दोन चार मित्रांना घेऊन तो येई. मग हाताची मनगटे दुखेस्तो भाकरी थापाव्या लागत. कष्टाने मिळालेला पैसा दहा वाटांनी पळून जाई. त्याचे दोस्त म्हणत, "वा! काय चव हाय वैनीच्या हाताला. झ्याक रस्सा झालाय. ममईच्या हाटेलात बी अशी चव नाय मिळायची."

 असे म्हणायला काय जातेय? नवरापण फुगारून जाई. पैसे पुरेनात म्हणून तिने दोन बंगल्यातली धुणीभांडी धरली. साठ रुपये येत. तेवढाच आधार. पूर्वी नवरा लाइनीवर असताना दारू जास्त ढोसत नसे. पण हळूहळू

दैवशीला
४९