पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणे! लग्नाच्या वेळी कमरेपर्यंत वेणी यायची. दैवा वयात आली तेव्हा होती बारा वर्षाची. पण मुलगी वयात येताच आईबापाला लागतो घोर. डोक्यावरचे ओझे फेकून द्यावे तशी नवऱ्याच्या दारात लेक ढकलून मोकळे व्हायचे पाहातात. चौदाची असतानाच दैवाचे लगीन ठरले. नवरा हनुमान नवलवाडीचा सातवीपसवर शिकलेला. मालट्रकवर क्लिनर, होता. वीस रुपये रोज मिळत असत.
 लग्न झाले नि दैवा सासरी आली. लग्न होईस्तोवर शेळ्यामेंढ्यांच्या मागे हिंडणाऱ्या दैवाला रसदार स्वैपाक जमत नसे, भाजी भाकरी करता येई. पण भाजीला ना खमंग चव ना भाकरीला गोल भिंगरी आकार. सासू शिकवी. पण शेवटी ती सासू. तिची टाच उंच आहे याचे तिला सतत भान असतेच. मग ती थोड्याफार शिव्या घालायची. कधी एखादा सटका द्यायची. पण त्याबद्दल दैवाची तक्रार नाही. कारण सासू कशी असते, त्याचे चित्र तिच्या आईने लग्नाआधीच जोरदार रंगवले होते. त्या चित्रापेक्षा तर ही बरीच होती म्हणायची! पण बावीस वर्षाच्या नवऱ्याबरोबर चौदा वर्षाच्या पोरीचे सूत काही जुळेना. सकाळी उठल्यावर कंबर ठणकायची, पाय जडावायचे. सगळे अंग ठसठसायचे. लग्नातल्या नव्या साड्या, पायातल्या चंदेरी साखळ्या, गळ्यातले पिवळे धमक डोरले हे सारे छान वाटायचे. पण लग्नाचा हा नवा अर्थ उमजत नसे. संध्याकाळ झाली की अंगावर शहारे येत. पळून जावेसे वाटे. आणि दोनदा रात्री पळत, धावत तिने माहेरची शीव गाठलीही होती. पण लगीन झालेल्या लेकीला माहेरही परकेच असते. आईने तिचा जीव ओळखला. कदाचित तिचे दिवस आठवले असतील.
 "बाई गं सगळ्याच बायांना जात्यातून जावं लागतं.
 काय सांगू भर्ताराचं? जीव त्याच्यात मुरला.
 केवड्याचा गंध जुईफुलानं सोशिला!!
 "चार दिवस होतोय तरास. तो सोसावाच लागतो. एखादं लेकरू झालं की भरताराची गोडी बायकुलाबी कळाया लागते. तरास सोसल्याबिगर गोडी कशी मिळनार?...."

 असे काही सांगून तिने पहिल्या वेळी दैवाला सासरी जाऊन घातले. पण दुसऱ्या वेळी मात्र बापाने कायदा हातात घेतला. दोन दणके घालून रोखठोक वजावले. “आता तुझं घर त्ये. विसाव्याला दोन दिसासाठी म्हायेराला ये. पन

४८
तिच्या डायरीची पाने