पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झालेले. विस्कटलेले केस. हातातल्या वांगड्या फुटलेल्या. मनगटावर रक्ताचे ठिपके. आमच्या संस्थेतील सर्वांच्या 'मम्मी' गंगाबाई तिला धरून बसल्या होत्या. मला पाहाताच तिने सूर काढला. 'काई ऱ्हायचं नाई मला तुमच्या संवस्थेत. दोन येळंला खायला दिलं तर काय उपकार केल्ये का? या. मम्मीला हाकलून द्या. माजं सामान द्या. कोरटात नेऊन हुबं करा मला…तिचं असंबद्ध बोलणं आतून जोडलेलं होत. मी तिचा हात धरून ऑफिसमध्ये नेलं.. आणि पाण्याचा पेला तिच्या हातात बळेच दिला नि म्हटलं, "आधी पाणी पी. चूळ भर. चहा घे नि मग तुझं सामान आण. तुला कोर्टासमोर नेऊन सोडते. मात्र तुला… एका तरण्याताठया बाईला, कार्टासमोर तिच्या हट्टामुळे सोडलय हे पोलिसांत जाऊन सांगणार मी."
 "मला नाही जायचं कोर्टात. तुमी कुठे गेलावता चार दिवस? इथं का आला न्हाई. मी फोन करते म्हनलं तर मम्मी रागावली मला. मी चा पिऊन हितच बसणारेय…"
 तिच्या या बोलण्यामुळे हसावं की रागवावं हे कळेनासं झालं.. "दैवा, तुझं खरं नाव, खरं नाव सांगितलंस तरच मी तुला इथं ठेवून घेईन. दहा दिवस झाले तुला येऊन. पण तू कुणाशी बोलत नाहीस. काय?" मीही वैतागून बोलले. मग मात्र दैवाने माहिती दिली.
 दैवाचं माहेर कन्हेरीचं. वडिलांकडे दोन एकर शेती. पण कोरडवाहू. वडील पाटलाच्यात सालदारी करायचे नि घरी खरिपाचे पीक घ्यायचे. माय शेतात रोजगार करायची. दैवाला दोन मोठ्या बहिणी. एक लगीन झाल्यावर सहा महिन्यांनी विहिरीत पडून मेली. दुसरीचा नवरा मुंबईला ड्रायव्हर म्हणून काम करतो. ती भारजाला सासरी राहाते. तो अधूनमधून येतो. दैवा तिसरी. तिच्या पाठीवर एक भाऊ. पुन्हा दोन बहिणी. "आमची माय एकतर गरवार असायची न्हाईतर लेकराला अंगावर पाजत तरी असायची. नि शिवाय मरेस्तो काम. आमी भैणी शेण गोळा करायचो. गवऱ्या थापायचो. पानी आनायचो. सरपन गोळा करायचो." दैवा.

 दैवा दिसण्यात उजवी. गुलाबी गोरा रंग, मोठे मोठे डोळे. सरळ नाक. दिलासाघरात आली तेव्हा केस खांद्यापर्यंत कापलेले होते. ते नवऱ्याने कापले होते

दैवशीला
४७