पान:तिच्या डायरीची पाने.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दैवा....दैवशीला....!!


 "नाव काय तुझं?" मी "...."
 "नाव तर असेलच की! होय? काय हो नाव हिचं? कुठली आहे? तुम्हाला कुठे भेटली?" पुन्हा मी. प्रश्न तिला येथे घेऊन येणाऱ्याला. उत्तर त्याच्यापाशीही नव्हते. दिसण्यात तरतरीत, तिशी पल्याडचा तो माणूस. त्याचे किंचित घारोळे डोळे, माझ्या मनात उगाचच संशय निर्माण करून गेले. "ही बाई गेले दोन दिवस कोर्टाबाहेर घोटाळतेय. रातच्याला धरमशाळेत एकटीनेच हाणाऱ्या बाईकडे लई लोकांचं ध्यान जात असतया. तसंच माझं बी गेलं. मी तिला चा पाजला. जेऊ घातलं. वचावचा जेवत होती. जेवता जेवता हात थांबवून माज्याकडं बगायची. तिची नजर एवढी अश्राप होती की माज्या मनातलं वाकडं पार धून निघालं. आन मी ठरवलं की तिला ठिकाणाला लावायचं. पर ही काईच बोलत नाही. घरी घेऊन जावं, तर बायकोला माझं मन कसं कळनार? त्यात तिचा तरी काय दोष? उगा या पोरीलाच ताप व्हायचा. मी कोरटाच्या कारकुनाकडं चवकशी केली. त्यानं तुमचा पत्ता दिला. घेऊन आलो इकडं. ताई कसंबी करा, या पोरीला तुमच्या संवस्थेत ठिऊन घ्या. लई उपकार व्हतील माझ्यावर. पोरगी रस्त्यात सोडून गेलो तर कोन काय म्हननार आहे? नवऱ्यानंबी सोडलीच की तिला रस्त्यावर! पन तिची अश्राप नजर सारखी आठवली असती. घास कडू झाला असता तोंडातला. काई पैसं भरायचे तर मी भरतो. हायेत ते ठिऊन घ्या." बोलता बोलता तो माझ्या पायाशी वाकला. स्वर जड झालेला होता. ऐकता ऐकता मीही जराशी अवघडले होते.

 "हे पहा भाऊ, पाया नका पडू. आमच्या संस्थेत नवऱ्याने सोडलेल्या स्त्रियांना आसरा मिळतो. त्यांना शिवण शिकवतो. कोर्टात केस दाखल करतो,

दैवशीला
४५