पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. एकत्र राहाणे कसे जमावे? पटले नाही तर पुढे कसे? असे त्यांना वाटे. अर्थात त्यांच्या म्हणण्यातही तथ्य होते.
 मधुकर पुण्यात राहणार. दोन घरातल्या, सासर नि माहेरच्या चार वयस्कांना 'नांदवणे' ही एक मोठी जबाबदारी होती. गीताचा स्वभाव तसा बडबड्या. काहीसा तापट. तिला ही जबाबदारी नीट पार करता येईल की नाही याची मलाही शंका होती. त्यासाठी तिच्याशी बोलणे महत्त्वाचे होते. ती जबाबदारी आमच्या कार्यकर्तीने संवादिनीने स्वीकारली. वृद्धाश्रम, त्यामागची कल्पना, तेथील वातावरण, वृद्धांना आवडणाऱ्या कामात त्यांना कसे गुंतवावे लागते वगैरे अनेक गोष्टी तिला सांगितल्या. माहिती दिली. त्यानंतर मधुकर, गीता, तिचे आईवडील, सासूसासरे सगळेच एकत्र बसले. मागील घटना कुणाच्या उकरून काढायच्या नाहीत, एखादी गोष्ट पटली नाही तर मोकळेपणी सांगायचे, टोमणे मारायचे नाहीत. सर्वांनी गीताला मदत करायची, असे ठरले. दोन वर्ष नीटनेटकी, समाधानाने पार पडली तर मग सहा एकर शेती वडिलांनी गीताचे नावें करावी असा निर्णय घेतला. आज या गाष्टीलाही तीनचार वर्ष उलटली आहेत.
 आज गीता, सासूसासरे, आईवडील यांच्या सोबत राहाते. वडिलांचे शेत दुसऱ्याला बटाईने दिले आहे. मधुकर वर्षातून तीनचार वेळा येऊन जातो. माहेरात आसरा न मिळालेली नकोशी मुलगी आज आई वडिलांना आणि सासूसासऱ्यांना दिलासा देत संसार करीत आहे.



४४
तिच्या डायरीची पाने