पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मोफत कायदा आणि कुटुंबसल्ला मदत केंद्राच्या रीतीनुसार आम्ही तिचे आई-वडील, जोडीदार, सासू-सासऱ्यांची एक बैठक घेतली, चर्चा केली.
 गीताच्या मनात वडिलांविषयीचा राग आलेला परत दाटलेला होता. घरात आईला होणारा जाच तिने जवळून पाहिला होता. भावांचे लाड तर आई नि वडील नको तितके करीत. दोघांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले होते. एकाला मटक्याचा नाद होता. दुसऱ्याची बायको जळून मेली होती. गीताच्या मनात आई विषयी पण आढी होती. तिला वाटे की, आई सुनेशी नीट वागली असती, मुलाला धाकात ठेवले असते तर तिने जीव दिला नसता. गीताच्या विवाहानंतर गेल्या नऊ-दहा वर्षात माहेरच्यांनी कधी तिची दखल घेतली नव्हती. बाप्पावर नि गीतावर घाणेरडा संशय घेणारे वडील, बाप्पांना घेऊन गीताच्या दारात आले होते. आपले दुःख सांगताना भडभडा रडलेही होते. पहिल्या भेटीत वडिलांना जेऊखाऊ घालून, शंभर रुपये खर्चाला देऊन पण "आता तरी माझा संसार नासवायला येऊ नका " असे ठामपणे बजावून त्यांना माघारी धाडले होते.

 मधुकर पुण्याहून आल्यावर तिने त्याच्या कानावर सारी हकीगत घातली. गीताची सासू अतिशय प्रेमळ आहे. गीताने बापाला एवढे टाकून बोलायला नको होते असे तिने आवर्जून लेकाला सांगितले. गीताचा बाप रीतीनुसार वागला. सगळा समाजच पोरींना गळ्यातली धोंड समजतो. "ज्याच्या घरी पाप त्याच्या घरी जन्मतात लेकी आपोआप" अशी म्हणच आहे. पाच पोरींना हुंडा द्यायचा म्हणजे बापाच्या गळ्यावर जूच की. त्यातून कोणत्याही वयाचा बाप्या नि लहानगी मुलगी एकत्र दिसले की लोकांना संशय येतोच. बाई नि बुवा यांच्यात तीनच स्वच्छ नाती असतात. आई, बहीण आणि मुलगी. अशा वेळी त्यांच्या मनात संशय येणे चुकीचे असले तरी ते रितीनुसार होते. त्यांच्यावर वसावसा रागावण्यापेक्षा त्यांना गोडीने बोलायला हवे होते असे गीताच्या सासूचे मत. सासूचे मत ऐकून गीताला खूप बरे वाटले. सासूबद्दलचा आदर आणखीनच दुणावला. गीता नि मधुकर आधी संस्थेत येऊन आमच्याशी बोलून गेले. मधुकर पुण्यात राहातो. रात्रशाळेत जाऊन त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. कामगार संघटनेचे कामही उत्साहाने करतो. सासऱ्यांनी शेत दिले नाही तरी, लेकीने त्यांना आधार द्यावा असे त्याचे मत. गीताचे सासरे मात्र काहीसे नाराज

गीता
४३