पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याचा निर्णय घेतला असता तर, संस्थेने त्याला सहकार्य केले असते. बधाई दिली असती. संस्थेचे नियम वेगळे आणि शिस्त वेगळी. ती पाळणे महत्त्वाचे. भविष्यात या संदर्भात त्याच्या हातून चुका घडल्यास त्याचे परिणाम त्याला स्वीकारावे लागले असते. विवाहाचा एक परिणाम वा फायदा म्हणून नोकरी मिळेलच असे त्याला वाटणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. कदाचित त्यातून संस्थेच्या कामावर दबावही आला असता. गीताच्या संसारातही त्यातून छोटीमोठी वादळे निर्माण झाली असती. अर्थात आम्ही आमच्या नकारामागची भूमिका गीता व बाप्पांना समजावून दिली. मुलाला मात्र सध्या जागा नाही, पुढे मागे जागा असल्यास विचार करू असे सांगून समजूत घातली. गीताचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावला. नव्या संसारासाठी लागणाऱ्या सामानाची यादी आमच्या दिलासातील इतर मुलींनी अगदी हौशीने तयार केली. प्रेशर कुकरचा आग्रह सर्व जणींनीच धरला. पोळपाट, कळशी, कढई, जर्मनचे डब्बे, वाट्या, पेले आदी भरपूर सामान मुलींनी जमवलं. मात्र सतरंजी, गादी आणि चादरीला जाणीवपूर्वक चाट मारली. हा निर्णय त्यांचाच.
 गीता गावातंच राहात होती. अधूनमधून संस्थेत येत असे. नंतर सासरच्या गावी गेल्याचे कळले. आज पाच वर्षानंतर दोन मुलांना घेऊन गीता समोर उभी राहिली. हातात अर्ज होता.
 "मी गीता मधुकर पाखरे मनस्विनीच्या दिलासाघरात राहात होते. तिथेच माझे लग्न झाले. आता मी सासरी आनंदात आहे. मला दोन मुले आहेत. माझे जोडीदार मधुकर, पुणे येथे दापोडीस काम करतात. मी गावी सासू-सासऱ्यांसह राहते. शेतमळा सांभाळते. माझ्या वडिलांनी माझ्या भावांच्या नावे १२ एकर शेत करून दिले. उरलेले सहा एकर शेत माझे नावे करून देतो म्हणतात. माझे भाऊ त्यांना सांभाळत नाहीत. त्यांचे फार हाल होतात. वडिलांची इच्छा माझ्याजवळ राहाण्याची आहे. मधुकरांच्या कानावर मी त्यांची इच्छा घातली. त्यांनी व मी असे ठरवले की तुम्हाला भेटून निर्णय घ्यावा. कृपया मला यावाबत सहकार्य करावे ही विनंती.

 आपली, 
गीता मधुकर पाखरे.

४२
तिच्या डायरीची पाने