पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प एका स्वयंसेवी संस्थेनी लोणावळ्याला आयोजित केला होता. आम्ही दोन कार्यकर्त्या पाठविण्याचे ठरवले. त्यात गीताची निवड केली. वातावरणात, विषयात बदल होईल, त्यातून तिचे मन स्थिर होईल असे वाटले. पण गीता तिथे जेमतेम आठ दिवस राहिली. दोन वर्षे शेतकरी संघटनेच्या लहानमोठया कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव असल्याने या प्रशिक्षणात तिला काही नवीन वाटेना. त्यातून तिथे आलेल्या महिलांच्या त्याच त्या गप्पांचाही तिला कंटाळा आला. बहुतेक प्रशिक्षणार्थी संसारी होत्या अथवा कुमारिका होत्या. कुणाला सारखे घर वा मुले दिसत. नवऱ्याची सय येई. तर कुमारिका पोरींची आपसात खुसपूस चाले. गीता तेथे काहीशी एकटी पडली. त्यातून डोंगर चढायउतरायची सवय नाही. शेवटी तिथे लेखी अर्ज देऊन बाई माघारी परत आल्या.

 एक दिवस बाप्पा एका बावीस-तेवीस वर्षाच्या तरुणास घेऊन मनस्विनीच्या कार्यालयात आले. या तरुणाचा विवाह तो दहा वर्षाचा असताना एका पाच वर्षाच्या चिंगुलीशी झाला. चौथी पास झाल्यावर तो तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी आला. मॅट्रिकची परीक्षा दिली, पण इंग्रजी विषयाने पाय अडकवला नि मॅट्रीक फेल ही डिग्री मागे लावली. खरे तर शाळेत असतानाच रेडिओ दुरुस्ती, लाईट फिटिंग, विजेच्या मोटारींची दुरुस्ती यांची विशष आवड निर्माण झाली. मग एका रेडिओ मेकॅनिकच्या हाताखाली दोन वर्षे काम केले. मध्ये बराच काळ लोटला होता. लहानपणी ज्या मुलीशी लग्न झाले होते तिच्या वडिलांना तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी करून द्यायचा होता. यालाही शिकण्याची इच्छा होती. तो नववीत असतानाच रिवाजानुसार काडीमोड झाला होता. रेडिओ मेकॅनिकचा धंदा बरा चालू लागल्यावर लग्न करण्याची इच्छा होती. पण त्याला पत्नी थोडंफार शिकलेली आणि गांवाकडे राहून शेत व सासू सासऱ्यांची काळजी घेणारी हवी होती. बाप्पांनी गीतूची माहिती दिली. पहिल्या भेटीत दोघांनी एकमेकांच्या आवडी निवडीबद्दल, मागील जीवनातील घटनांबद्दल गप्पा मारल्या. दुसऱ्या भेटीत मुलाने प्रश्न केला की संस्थेत नोकरी मिळेल का? बाप्पांचीही इच्छा होती की मुलाला संस्थेच्या व्यापात सामावून घ्यावे. पण आम्ही या गोष्टीला विरोध केला. पूर्वीपासूनच तो संस्थेत असता आणि नंतर संस्थेतील मुलीशी विवाह

गीता
४१