पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गरीब होती. तिला कुंबेफळात दिली होती. नवरा टेलर काम करायचा. अण्णांनी दोन एकराचा तुकडा इकून लगीन करून दिलं. वरीसभर सुद्धा नांदली नाही. पंचमीला पहिल्यांदा माहेरपणाला आली तेव्हा खूप घुसमटल्यागत वाटली. डोळं नेहमीच भरून वाहात. आमच्या धाकटया काकीने खोदून-खोदून विचारलं. पन तिनं काहीच थांगपता लागू दिला न्हाई. आणि नवरात्रीच्या तिसऱ्या माळंलाच तिच्या गावाकडून निरोप आला की सकाळी पानी भरतांना हिरीत पाय घसरून पडली नि तिथंच म्येली. अण्णा नि आई फकस्त मातीला पोचले. माय एक दिवस आक्कीला सांगत होती की, तोंडावर, हातावर ओचकाऱ्याचे वरखडे होते. माज्याहून मोठी रंजा. तिचा नवरा मुंबईत फरशी बसवण्याचे काम करतो. चार महिन्याला फेरी मारतो. रंजा सासू सासऱ्यांना सांबाळते. तीन एकराचा मळा आहे. भरपूर काम करते. मजेत राहाते.
 माज्या नवऱ्याने पहिली बायको टाकून दिली. का तर लेकरू होत नाही म्हणून! रंजा आणि शांतूच्या लग्नाच्या खर्चात अण्णा बुडालेले होते. माज्यासाठी त्यांनी फारशी जिकीर न करता दोन पैसे देणाऱ्याच्या गळ्यात मला बांधून टाकले. माज्या नवऱ्याचा व्याजाने पैसे देण्याचा धंदा आहे. पैसा भरपूर. शिवाय पिढीजात पाटिलकी. त्याला कुठल्या की वैदूनं सांगितलं नुकतीच वयात आलेली पोरगी कर. औषध देतो, सहा महिन्यात गरवार राहील. लगीन झालं. वरीस झालं तरी माझी पाळी येत राहिली. नि मग माझ्या छळाला पारावार राहिला नाही. नहाणं येऊन तीनच महिने झाले होते. तोच लगीन झालं. नवऱ्याचा लई त्रास व्हायचा. पन जाणार कुठे? बापानं मोजून चार हजार घेतले होते. रडत पडत दोन वर्ष त्याच्या घरात राहिले.

 ताई, शिणेमात सुद्धा असला त्रास दाखवला नसेल असा छळ तो करायचा. डोक्यावर दगडाचं जातं ठेवून तासन्तास उभं करायचा. शिवाय दोन्ही हातात दगड. जातं तर पडलं नाही पाहिजे. पैशाच्या जोरावर त्याला तिसरी बायको आणायची होती. मी माहेरी पळून तरी जावे नाहीतर मरून तरी जावे अशी त्याची इच्छा. तो अडानी नव्हता. बायकोच्या डोक्यात दगड घालायची वा रॉकेल ओतून काडी लावायची बी हिंमत नव्हती. म्हणूनच फार-फार त्रास द्यायचा. भर उन्हात बिनचपलांची उभी करायचा. शेतात नेऊन सारे चाळे

३८
तिच्या डायरीची पाने