पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चालत. शेवटी सोसवेना म्हणून एक दिवस पळून बापाच्या घरी आले. आईला माराचे वण दावले. तिलाच कळवळा आला. माहेरी तीन वरीस होते. त्या काळातच वाप्पा भेटले. शेतकरी संघटनेचं काम करायचे. बायांच्या मिटिंगा घेत. मी पण तिथे जाई. माझ्या बंद डोक्याचं मशीन पुन्हा चालू झालं. सहावी पसवर वर्गात नेहमी पहिली येत होते. ते दिवस पुन्हा जागे झाले. मिटिंगमध्ये मी पण बोलायची. बाप्पा नि सारेच भाऊ माझं कवतुक करीत. अण्णाला हे आवडत नसे. पण माझ्या पाठच्या भावाने कधी हरकत घेतली नाही. पुण्याला एकदा संघटनेचं बायांचं शिबीर होतं. मला जायचं होत. पण अण्णांची परवानगी नव्हती. आईच्याकडून पैसे घेऊन मी शिबिराला इतर बायांबरोबर गेले. घरी आल्यावर अण्णांनी घरात घ्यायलाच नकार दिला. बाप्पा माझ्या आजोबांसारखे. गेली चाळीस वर्ष कम्युनिस्ट पक्षात काम करणारे. पण त्यांच्या नि माझ्याबद्दल घाणघाण सौंशय घेऊन बोलले. मग मात्र मी ठरवलं. विहीर गाठायची पनं माहेराला रामराम ठोकायचा. मग बाप्पांनी मला पिंपळपूरच्या संघटनेच्या ताईंकडे ठेवले. तिथे महिना काढला. पण पुढे काय? हा प्रश्न होताच. तेवढ्यात या संस्थेची माहिती कळाली. नि मला बाप्पांनी इथे आणून घातले." अशी ही गीता चार महिने दिलासा घरात होती. गुबरे गाल. अपरे नाक. नेहमीच उत्सुकतेने विस्फारलेले मोठेमाठे डोळे. उंची जेमतेम चार फूट दहा इंच असेल. ठुसका बांधा. गीताला संसाराची खूप हौस होती. बाजार करण्यात, स्वयंपाक करण्यात रस होता. अशा या गीताचे लग्न करून द्यावे असा बाप्पांचा आग्रह होता. योग्य मुलगा शोधण्यास मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. अर्थात गीताशी बोलल्याशिवाय लग्नाचा घाट घालणे योग्य वाटेना. कारण विवाहाच्या संकल्पनेभोवती सांस्कृतिक, भावनिक व धार्मिक रेशीम कलाबतूंची सुनहरी नक्षी विणलेली असली, तरी शेवटी पुरुषाला हवी असलेली "बाई” ची गरज, असेच मूळ स्वरूप असते. खेड्यात काय किंवा शहरात काय फारसा फरक नसतो. गीताला तर वयाच्या चौदाव्या वर्षीच तिशीच्या घरातल्या, त्यातूनही मूल होत नाही म्हणून बेचैन असलेल्या आणि त्यासाठी हपापलेल्या पुरुषाचा शारीरिक सहवास सहन करावा लागला होता. त्या मानसिक धक्क्याचे नेमके स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे होते.

 दिलासाघर सुरू झाल्यापासून प्रथमच मानसशास्त्राच्या तांत्रिक अभ्यासाची

गीता
३९